Police Flash News

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चालायची गुटख्याची तस्करी !! पो. नि. दिलीप गाडे यांच्यासमोर नाहीत चालायची अवैध धंद्याची मस्करी !!

0
19
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चालायची गुटख्याची तस्करी !!

पो. नि. दिलीप गाडे यांच्यासमोर नाहीत चालायची अवैध धंद्याची मस्करी !!

उदगीर (ॲड. एल पी उगीले) उदगीर शहर हे तेलंगणा, कर्नाटका, आंध्रा आणि महाराष्ट्र या चार राज्याच्या सीमेवर असल्याचा फायदा घेत, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला आणि सुगंधी तंबाखू, गुटखा याची चोरटी आयात करून जास्त किमतीमध्ये विक्री करण्याचा घाट गुटखा माफीयांनी चालवला आहे. कित्येक वेळा हे गुटखा माफीयावाले उदगीर मार्गे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये आणि शहरांमध्ये गुटखा पाठवण्यासाठी अंधाराचा फायदा घेऊन तस्करी करायचे. उदगीर शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये काही प्रमाणात हा प्रकार चालू होता. या संदर्भामध्ये प्रसिद्धी माध्यमातूनही आवाज उठवला जात होता. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दिलीप गाडे यांनी हे प्रकार थांबले पाहिजेत. या दृष्टीने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची गस्त वाढवली. विशेष करून सीमा भागातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनावर विशेष निरीक्षण चालू ठेवले.

उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील नामदेव चेवले, संदीप केंद्रे, राजकुमार डबेटवार, अभिजीत लोखंडे, बजरंग गुजलवार, राजकुमार देवडे यांच्या पथकावर पो. नि. दिलीप गाडे यांनी विशेष जबाबदारी सोपवली होती. सीमा भागातून गुटख्याच्या गाड्या येतात, ही चर्चा विचारात घेऊन दक्ष राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. या पथकाने सापळा रचून बिदर रोडवर ठाकरे चौकाजवळ रात्रीच्या वेळी कडा पहारा सुरू केला. पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आले.

14 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ठाकरे चौक परिसरामध्ये हे पथक गस्त घालत असताना, एम एच 21 बी एफ 93 90 क्रमांकाची मारुती सुझुकी डिजायर कार आलेली त्यांना दिसली. संशयावरून या पथकाने त्या कारला थांबवून तपासणी केली असता, कार मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा अर्थात सुगंधित तंबाखू आणि पान मसाला असा एकूण एक लाख 87 हजार 950 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. या मालाची वाहतूक करण्यासाठी उपयोगात आणलेली मारुती सुझुकी डिजायर कार ज्याची किंमत आठ लाख रुपये आहे, ती कारही या पथकाने जप्त केली. असा एकूण नऊ लाख 87 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलिस अंमलदार बजरंग गजलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्रमांक 719/26 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275, 3 (5) तसेच अन्नसुरक्षा व मानके अधिनियमाच्या कलम 59 अन्वये दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 2: 51 वाजता सदरील गुटख्याची वाहतूक करणारे मंचक रघुनाथ मोटे, (वय 31 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार अंकोली तालुका गंगाखेड जिल्हा परभणी) आणि त्याचा साथीदार मारुती मुजाजी गायकवाड (वय 39 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार अंकोली तालुका गंगाखेड जिल्हा परभणी) या दोघांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरवटे हे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उदगीर परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, विक्री व साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क करावा. संपर्क करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. अशा मोठमोठ्या कारवायामुळे अवैध धंदेवाल्यावर चांगला वचक बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts