लातूर (प्रतिनिधी)
दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न केल्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये जीवितहानी होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशातच लातूर-बार्शी रोडवरील रामेगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रामहरी बालाजी पाटील (वय २७ वर्षे, रा. गिरवलकर नगर, लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. हेल्मेटचा वापर केला असता, तर डोक्याला झालेली गंभीर दुखापत टाळता येऊन त्याचे प्राण वाचण्याची शक्यता होती. या घटनेमुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
आज पहाटे सुमारे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान रामहरी बालाजी पाटील हे एमएच-२४-सीसी-३११८ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना लातूर-बार्शी रोडवरील रामेगाव फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना गातेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
हेल्मेट हे केवळ नियमपालन नव्हे, तर जीवनरक्षणाचे कवच!
दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे हा केवळ कायद्याचे पालन करण्याचा विषय नसून, स्वतःचा जीव वाचविण्यासाठी घेतलेली महत्त्वाची खबरदारी आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो. योग्य दर्जाचे हेल्मेट डोक्याचे संरक्षण करण्यास मदत करते आणि गंभीर दुखापतीचा धोका कमी करू शकते.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे. मात्र, या प्रयत्नांनंतरही काही नागरिक हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा दुर्घटनांमधून निष्पाप जीव गमावण्याची वेळ येत आहे.
लातूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाने सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, दुचाकीवरून प्रवास करताना प्रत्येक वेळी स्वतः हेल्मेट वापरावे तसेच मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालावे. जवळचा प्रवास असो किंवा लांबचा, दिवस असो किंवा रात्र, हेल्मेट वापरणे टाळू नये.
आपला जीव अनमोल आहे. आपली वाट पाहणारे कुटुंब घरी आहे, याचे भान ठेवून दुचाकी चालवा. वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतुकीचे नियम पाळा आणि प्रत्येक प्रवासात हेल्मेटचा वापर करा. हेल्मेट वापरा, स्वतःचे जीवन सुरक्षित करा आणि आपल्या कुटुंबाचे सुरक्षा कवच बना, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.














Responses (0 )