उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील
वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन्ना उमरगा येथील शेतशिवारातून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा गुन्हा उघडकीस आणण्यात वाढवणा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेली अंदाजे ७० हजार रुपये किमतीची ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.
मन्ना उमरगा येथील सर्व्हे क्रमांक ४३ मधील शेतशिवारात लावलेली ट्रॅक्टरची ट्रॉली दिनांक ९ जून २०२६ रोजी रात्री चोरीस गेली होती. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची चौकशी करण्यात आली. यावेळी धनंजय संतोष लासुरे (वय २३), ओम साई निलेश बिरादार (वय २२) आणि रामेश्वर उमाकांत कबाडे, तिघेही रा. तोंडार, ता. उदगीर, यांच्याकडे चौकशी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली ७० हजार रुपये किमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली जप्त करण्यात आली. ही कामगिरी वाढवणा पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड, पोहेकॉ संजय दळवे, पोहेकॉ शिवप्रताप रंगवाळ, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गाडगे आणि चालक मधुकर कारलेवाड यांच्या पथकाने केली.
वाढवणा पोलिसांच्या या कामगिरीमुळे शेतशिवारातील चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे. याबद्दल वाढवणा पोलिसांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.














Responses (0 )