देवर्जन (प्रतिनिधी) देवर्जन व परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी वैद्यकीय सेवा मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हेर जी. प. गटाचे जिल्हा सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते प्रा. दिलीपकुमार मटके यांनी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९:४० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, देवर्जन येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे आढळून आले.
त्यामुळे रात्रीच्या आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या भेटीदरम्यान पंचायत समिती सदस्य चंद्रकांत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील,देवर्जन गावातील संतोष रोडगे, माधव रोडगे, राम कांबळे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
देवर्जन आणि परिसरातील नागरिकांकडून रात्रीच्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या तक्रारींची सत्यता पडताळण्यासाठी प्रा.दिलीप मटके यांनी प्रत्यक्ष आरोग्य केंद्राला भेट दिली. पाहणीदरम्यान तेथे एक सेविका आणि एक एएनएम (सहाय्यक परिचारिका प्रसविका) उपस्थित असल्याचे दिसून आले; मात्र डॉक्टर उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांकडे रात्रीच्या वेळी डॉक्टरांच्या उपलब्धतेबाबत विचारणा केली असता, रात्री डॉक्टर उपस्थित राहत नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते. रात्रीच्या वेळी एखादा रुग्ण उपचारासाठी आल्यास त्याच्यावर उपचार कसे केले जातात? असा प्रश्न विचारला असता, एएनएम स्वतः रुग्णावर उपचार करत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गंगापूर येथील एक महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल झाली असता, एएनएम यांनी स्वतः तिच्यावर उपचार सुरू केल्याचेही यावेळी समोर आले. प्रसूतीसारख्या संवेदनशील परिस्थितीत डॉक्टरांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न असल्याने आरोग्य केंद्रातील रात्रीच्या सेवांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
या प्रकाराची माहिती प्रा. दिलीपकुमार मटके यांनी दूरध्वनीद्वारे तालुका वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना दिली. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
रात्रीच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर:-
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक उद्भवणारी आजारपणे, अपघात आणि प्रसूतीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक असते. अशा वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्यास रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
देवर्जन प्राथमिक आरोग्य केंद्रातील या पाहणीनंतर रात्रीच्या वेळी डॉक्टरांची उपस्थिती, रुग्णांना मिळणारी सेवा आणि आपत्कालीन उपचारांची व्यवस्था याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन रात्रीच्या वेळी डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.














Responses (0 )