निलंगा (प्रतिनिधी) गुऱ्हाळ गावामध्ये नवरात्रोत्सवाच्या खर्चाला फाटा देत दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा सामाजिक उपक्रम स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबविण्यात येत आहे. एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसह विविध प्रकारची मदत उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दुष्काळामुळे शेतीचे नुकसान, आर्थिक अडचणी तसेच पशुधनासाठी चारा आणि पाण्याची टंचाई अशा अनेक संकटांना शेतकरी कुटुंबांना सामोरे जावे लागत आहे. या कठीण परिस्थितीत उत्सवावरील खर्च टाळून गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा आहे. या मदतकार्यात गरजू शेतकरी कुटुंबांना किराणा व जीवनावश्यक साहित्य, महिलांना साड्या, मुलांना कपडे आणि आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पशुधनासाठी चारा, पशुखाद्य आणि पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यावरही भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना संकटातून सावरण्यासाठी अशा मदतीची नितांत गरज असून, समाजातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनीही पुढे येऊन गरजूंच्या मदतीसाठी हातभार लावावा, हा या उपक्रमामागील संदेश आहे. संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना दिलासा देणे, हीच खरी सामाजिक सेवा असल्याची भावना या उपक्रमातून व्यक्त होत आहे. गुऱ्हाळ गावातील हनुमान मंदिर येथे हे मदतकार्य आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी प्रमोद नाना भानगिरे, शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख, माजी नगरसेवक, पुणे महानगरपालिका आणि एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, यांचा पुढाकार आहे.














Responses (0 )