अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात आज इतिहासाचे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले ” या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महात्मा फुले जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक दि.११ एप्रिल २०२२ सकाळी ठीक १०:४५ वाजता. इतिहास विषयाच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे यांची व किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे कार्यकारी संचालक, पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून या चर्चासत्राचे उद्घाटन कॅलिफोर्निया, अमेरिका येथील डॉ. देवयानी बोरसे या करणार आहेत. तसेच बीजभाषक म्हणून ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत तथा नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश सदाशिव दंदे हे आभासी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रामधील शोधनिबंध सत्राचे अध्यक्षस्थान वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख व प्रसिद्ध लेखक प्रा.डाॅ. रामभाऊ मुटकुळे हे भूषविणार आहेत. तसेच या सत्रात शोध निबंध वाचक म्हणून औरंगाबाद येथील डॉ. सुनीता सावरकर, सांगली येथील प्रा.सुरेश दांडगे आणि पुणे येथील प्रा. डाॅ. गणेश भामे हे अभ्यासक शोधनिबंध सादर करणार आहेत. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये अधिकाधिक प्राध्यापकांनी, संशोधकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे संयोजक तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे व डॉ. संतोष पाटील यांनी केले आहे.