राजकारण न करता सत्ताधारी व विरोधकांनी लातूरकरांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यावर लक्ष द्यावे – मकरंद सावे
लातूर (प्रतिनिधी) : लातूरकरांना गेल्या अनेक दिवसांपासून पिवळ्या व काळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. सत्ताधारी व विरोधक दोघेही सत्ताधारी असताना राजकारण व एकमेकांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत.
यावर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे पाणी मिळत आहे. परंतु पाण्याचे योग्य नियोजन व्यवस्थापन न केल्याने लातूरकरांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लातूर शहरातील विविध भागातील दहा ते बारा वर्षांपासून पाणी गळतीतून वाया जाणारे हजारो लिटर पाणी रोखण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व पाणीगळती थांबविली, सध्या मात्र लातूर शहर महानगरपालिकेतील काँग्रेस व भाजपा आघाडीचे सत्ताधारी मात्र लातूर शहर मनपासमोरच असलेली, गावभाग, गंजगोलाई मंदीरा समोरील पाणी गळती रोखू शकत नाहीत. काँग्रेस भाजपा एकमेकांवर सोशल माध्यमातून आरोपप्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. महापौरांनी पिवळे, काळे, गढुळ पाणी पिऊन कसे पिण्यायोग्य आहे सांगण्यात तर भाजपाने सत्ताधाऱ्यांमुळेच नागरिकांवर विनाकारण दूषित पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. असा आरोप करत धन्यता मानली. मात्र कोणीही अचानक पणे पाणी सोडण्याचे वेळापत्रक, नियोजन का व कसे बिघडते, आठ दिवसांवरून कधी दहा तर कधी बारा दिवसांनी पाणी सोडले जाते, यावर चकार शब्द काढला नाही. येत्या आठवडाभरात लातूर शहर महानगरपालिकेने पाण्याचे नियोजन व वेळापत्रक जाहीर केले नाही तर लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूरकरांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी दिला आहे.