नांदेड लातूर रोड लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा
रेल्वे संघर्ष कृती समितीची अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड यांच्याकडे मागणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणारा नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपुर चाकुर हा नवीन रेल्वे मार्ग तातडीने मंजूर करावा,मंजुरीच्या कामाला गती द्यावी अशी आग्रही मागणी रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने तालूक्याचे भूमिपूत्र केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना. डाॅ. भागवत कराड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड हे आज लातूर दौऱ्यावर होते. त्यामुळे रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने आज एक शिष्टमंडळ मौजे किनगांव येथे आले होते.या वेळी ना.डाॅ.भागवत कराड यांची भेट घेवून या नवीन मार्गाच्या मंजूरीच्या संबंधाने मागणीचे निवेदन दिले आहे. हा नवीन मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा कमी खर्चीक मार्ग असून नांदेड लोहा अहमदपूर चाकूर या भागासाठी हा खूप महत्त्व पूर्ण आहे.या मार्गाचा सर्व्हे झाला आहे मात्र केवळ उत्पन्न कमी येणार आहे या साठी हा मार्ग रेल्वेमंत्रालयात प्रलंबीत आहे.नांदेड व लातूर या दोन्ही जिल्ह्यातील जनतेसाठी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा व महत्त्वपूर्ण असून आता नव्याने या मार्गासाठी निधीची तरतूद करून नवीन रेल्वे मार्ग मंजूर करून घ्यावा असे निवेदनात विनंती केली आहे. या वेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना. डाॅ. भागवत कराड यांनी या प्रश्नी स्वतः लक्ष घालण्याचे अश्वासन शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात माजी मंत्री विनायकराव पाटील,माजी आमदार बब्रूवानजी खंदाडे, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, दिलीपराव देशमुख,अँड.भारतराव चामे, रेल्वे संघर्ष कृती समितीचे सचिव युवकनेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य धनराज गूट्टे, कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, पत्रकार अजय भालेराव, भीमराव कांबळे, त्रिशरण मोहगांवकर, राहूल गायकवाड आदींची उपस्थिती होती.