शिवाजी महाविद्यालयातर्फे ग्रीन बामनीसाठी 151 वृक्ष
उदगीर : येथील शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्ष दान-दत्तक अभियानाच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची मोहिम राबवन्यात येत आहे. याअंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व समाजातील सेवाभावी वृत्तीच्या नागरिकांकडून दान रूपाने वृक्ष संकलित करून त्याचे दत्तक रूपाने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मौजे बामनी या गावी ‘ग्रीन बामनी’ नावाने जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या महावृक्षारोपण कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने 151 वृक्ष लागवड करण्यासाठी देण्यात आले. तसेच वृक्षारोपनासाठी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव व मुख्यकार्यक्रमाधिकारी प्रो. डॉ. सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष दान-दत्तक अभियानाचे संयोजक कार्यक्रमाधिकारी प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी या कार्याचे नियोजन केले.
याप्रसंगी ग्रीन बामनीचे सर्वेसर्वा राजकुमार बिराजदर यांच्याकडून प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गाव बामनी येथे करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. महाविद्यालयचे उप-प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, कार्यक्रमाधिकारी डॉ. किरण गुट्टे, प्रा. ए. एस. टेकाळे यांचे सहकार्य मिळाले. याप्रसंगी रासेयो स्वयंसेविका व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.