अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात आज स्वामी विवेकानंदांवर आंतराष्ट्रीय चर्चासत्र
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व स्वामी विवेकानंदाची भारत व जगासाठी योगदान या विषयावर उद्या दि ३० ऑगस्ट रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी विवेकानंदाचे भारत व जगासाठी योगदान या विषयावर होत असलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे भूषविणार असून या चर्चासत्राचे उद्घाटन अमेरिका येथील स्वामी विवेकानंद या विषयाचे गाढे अभ्यासक डॉ. सेन पाठक हे करणार आहेत. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर व सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर, बीजभाषक म्हणून स्वामी विवेकानंद विद्यापीठ, पश्चिम बंगाल येथील डॉ. स्वामी जपानंद हे मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या निबंध वाचन सत्राचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र इतिहास परिषद मुंबई चे अध्यक्ष डॉ. सतीश कदम हे भूषविणार असून या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात पुणे येथील डॉ. ज्योती रामोड, संभाजी नगरच्या डॉ.सुषमा देशपांडे व यवतमाळच्या डॉ. कविता तातेड ह्या शोधनिबंधाचे वाचन करणार आहेत. सायंकाळी ६वाजता होणा-या या आंतरराष्ट्रीय ई – चर्चासत्रात आभासी पद्धतीने अधिकाधिक अभ्यासक, प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे. असे, आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी तसेच संयोजक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे आणि सहसंयोजक डॉ. संतोष पाटील यांनी केले आहे.