मुन्ना पाटलामुळे बाजार समितीला विकासाचा टप्पा गाठता आला – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, हमाल, मापाडी यांच्यासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना प्रत्यक्षात राबवून, त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे. बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने पाच वर्षात शेतकऱ्यांच्या हिताची उल्लेखनीय कामे केलेली आहेत.
त्यामुळे उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक सुबत्ता तर आलीच आली, त्यासोबतच विकासाचा टप्पा गाठताना ही बाजार समिती मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे गौरवोद्गार माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी काढले.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी भवन व शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. या शॉपिंग कॉम्प्लेक्स भूमिपूजन प्रसंगी आ.बनसोडे बोलत होते.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नातून मादलापूर परिसरात पाच कोटी 80 लाख रुपये निधी खर्चून उभारण्यात येत असलेल्या शेतकरी भवन व शॉपिंग कॉम्प्लेक्सचे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश सचिव राजेश्वर निटूरे हे होते.
व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उपसभापती रामराव बिरादार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, वीरशैव लिंगायत समाजाचे तालुकाध्यक्ष तथा सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे, मादलापूर ग्रामपंचायतचे सरपंच उदय मुंडकर, सहाय्यक निबंधक बाळासाहेब नांदापूरकर, प्रा. धनाजी जाधव, संतोष बिरादार, रंजीत कांबळे, विधीज्ञ पद्माकर उगिले, गजानन बिरादार, गौतम पिंपरे, मोहन गडकरी, चंद्रप्रकाश कटके, कुणाल बागबंदे तसेच बाजार समितीचे सचिव भगवानराव पाटील इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्या दूरदृष्टी मुळे त्यांच्यासोबत असलेल्या संचालक मंडळाने बाजार समितीची उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. आगामी काळात देखील बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आध्यक्षिय समारोप प्रसंगी राजेश्वर निटुरे यांनीही बाजार समितीच्या विकासाच्या संदर्भात गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नंदकुमार पटणे यांनी केले. याप्रसंगी उदगीर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.