दयानंद कला महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रास मंजुरी
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील नवीन अभ्यासक्रमास मंजुरी मिळाली आहे. अभ्यास केंद्रांतर्गत बी.ए, एम.ए अर्थशास्त्र व एम.बी.ए हे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2022- 23 मध्ये चालू करण्यात आले आहेत. त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असे प्रतिपादन डॉ.संतोष पाटील यांनी केले. जे विद्यार्थी महाविद्यालयात नियमित उपस्थित राहून शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती साध्य करण्यासाठी, तसेच जे विद्यार्थी नोकरीमध्ये कार्यरत आहेत अशा विद्यार्थ्यांना नोकरी करत करत उच्च शिक्षण घेता यावे या उद्दिष्टाने अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे असे मत डॉ संतोष पाटील यांनी व्यक्त केले.
दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांनी असे प्रतिपादन केले की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या अभ्यास केंद्राचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. समाजातील अप्रगत घटकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा व ग्रामीण भागातील विशेषता महिलांच्या शैक्षणिक गरजांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक तंत्राचा वापर करून नाविन्यपूर्ण लवचिक अशा शिक्षणपद्धतीचा प्रसार करणे हा अभ्यासक्रम चालू करण्याचा मूळ उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या नवीन अभ्यास केंद्रास मान्यता प्राप्त झाल्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष मा.ललितभाई शहा, मा. रमेशकुमार राठी, सचिव मा.रमेशजी बियाणे, संयुक्त सचिव मा.सुरेश जैन, कोषाध्यक्ष मा. संजयजी बोरा, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, द.क.म. उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधीक्षक श्री. रुपचंद कुरे यांनी शुभेच्छा दिल्या.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या नवीन अभ्यास केंद्रामध्ये केंद्रप्रमुख म्हणून प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, केंद्र संयोजक पदी डॉ संतोष पाटील तर केंद्र सहाय्यक पदी प्रा.महेश जंगापल्ले हे कार्यरत आहेत.