सेवानिवृत्त प्राध्यापक गंदीगुडे यांचे एटीएम कार्ड बदलून चाळीस हजाराला चुना

सेवानिवृत्त प्राध्यापक गंदीगुडे यांचे एटीएम कार्ड बदलून चाळीस हजाराला चुना

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक महादेव गंदिगुडे हे आपल्या मोबाईल मध्ये एटीएम चे ओटीपी पाहत असताना एका अज्ञात व्यक्तीने एटीएम मध्ये येऊन त्यांच्या कार्डाची अदलाबदल केली. दरम्यान उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या एटीएम मध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक महादेव बसवन्ना गंदीगुडे हे गेले असता, त्या ठिकाणी त्या एटीएम मध्ये रांगेत असलेल्या त्यांच्या पाठीमागील एका अज्ञात व्यक्तीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रामधून प्रा. महादेव गंदीगुडे यांचे एटीएम कार्ड बदलून दुसरे एटीएम कार्ड दिले.

तसेच दरम्यानच्या काळात महादेव गंदीगुडे यांनी एटीएम कार्डाचा संकेतांक मशीन मध्ये टाकला होता. त्यावेळेस पाठीमागे असलेला व्यक्ती त्या संकेतांकाची पाहणी काळजीपूर्वक करत होता. त्याने कार्ड बदलून टाकले, महादेव गंदिगुडे यांनी मशीनमध्ये पुन्हा पुन्हा आपला एटीएम कार्ड टाकून संकेतांक मशीनला दिला. मात्र प्रत्येक वेळी चुकीचा संदेश आहे. अशा पद्धतीचा संदेश मशीनवर दर्शवू लागला, एटीएम मशीनवर दर्शनी भागात दाखवत असलेला संकेतांक पाहून गंदिगुडे यांनी मशीन मधील कार्ड घेऊन बाहेर पडले. नंतर काही वेळा त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे मोबाईलवर एसएमएस आले.

त्यामुळे ते चौकशी करण्यासाठी बँकेकडे परत फिरले. ते बँकेत येईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या खात्यातून 40 हजार रुपये अज्ञात चोरट्याने काढून घेतले होते. ही बाब त्यांनी बँकेत जाऊन बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नजरेस आणून दिली. त्यानंतर बँकेने त्यांचे खाते ब्लॉक केले. याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गोरख दिवे वेळोवेळी अशा संभाव्य फसवणुकीच्या संदर्भात समाज माध्यमावर मार्गदर्शन आणि जनतेला संदेश देत असतात. मात्र गाफील राहिलेल्या प्राध्यापक महादेव गंदीगुडे यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या एटीएम कार्डाची अदलाबदल केली, आणि त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी उदगीर शहर पोलिसात रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला असून तेलंगणा येथील एका युवकास चौकशीसाठी संशयित म्हणून उदगीर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

About The Author