शहरातील उड्डाण पुलावरील लाईट व हेरिटेज पोलच्या कामाचे भूमिपूजन
उदगीर (एल पी उगिले) : उदगीर शहरातील नळेगाव रोड आणि बिदर रोडवरील सध्या वाहतूक वाढलेली आहे. उड्डाणपूलांच्या दोन्ही बाजूंच्या पुढे वसाहती निर्माण झालेल्या असल्यामुळे वर्दळ वाढली आहे. विशेषतः नळेगाव रोडवरील उड्डाणपूलावर रात्री बे रात्री वाहतूक वाढली आहे. उदगीरच्या प्रगती सोबत रेल्वेच्या फेऱ्या वाढल्यामुळे रेल्वेने येणारे जाणारे प्रवासी या उड्डाण पुलावरून ये जा करतात.
मात्र उड्डाणपूल झाल्यापासून या उड्डाण पुलावर लाईटची सुविधा नव्हती. त्यामुळे रात्री बेरात्री भुरटे चोर तसेच पहाटेच्या वेळी शिकवणीसाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी छेडछाड करणारे रोड रोमिओ या उड्डाण पुलावर बसून छेडछाड करायचे. जवळपास दहा वर्षापासून या उड्डाण पुलावर लाईटची सुविधा करावी. अशी मागणी होत होती. आजपर्यंत या अत्यंत चुकीच्या पद्धतीने बनलेल्या उड्डाण पुलावरून पडून दोन-तीन मोटार सायकल स्वारांच्या गंभीर स्वरूपातील अपघातात दोघांचा मृत्यू झालेला आहे. किमान लाईटची सुविधा झाल्यानंतर अशा अपघातांना आणि लुबाडणूक करणाऱ्या प्रवृत्तीला निश्चितपणे आळा बसेल, असा विश्वास जनतेला वाटू लागला आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून ची मागणी माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी डी पी डी सी च्या माध्यमातून मंजुरी घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.या भूमिपूजन प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा मलकापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.