मनसेचे रास्ता रोको आंदोलन, लातुर जिल्हयातील शेतकऱ्याना सरसकट अनुदान व पिकविमा द्या – संजय राठोड

मनसेचे रास्ता रोको आंदोलन, लातुर जिल्हयातील शेतकऱ्याना सरसकट अनुदान व पिकविमा द्या - संजय राठोड

उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टी , सततचा पाऊस, शंखी गोगलगायीमुळे व मोझॅक ( हळद्या) रोगामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13600 रुपयाचे अनुदान जाहीर केले आहे. तसेच जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशाने प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत हंगाम कालावधी मधील प्रतिकूल परिस्थिती उदाहरणार्थ पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षांमधील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने नुकसान भरपाई च्या 25% मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.

एकूण पेरणी क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्र जर यामुळे बाधित झाले असेल, अशा प्रसंगी अशी अधिसूचना काढण्यात येतात यानुसार यावर्षी लातूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील फक्त 14 महसुल मंडळे ही या उत्पादनातील घटीसाठी पात्र ठरविण्यात आलेली आहेत. वास्तविक पाहता लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना यावर्षी पेरणी झाल्याबरोबर शंखि गोगलगायीच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले होते. सोयाबीन उगवल्याबरोबर शंखि गोगलगायी ते खाऊन टाकत होत्या, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली.

हे नुकसान सुरू असताना अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे तसेच मोझॅक रोगामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बाबीमुळे यावर्षी लातूर जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या उत्पादनात दरवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त घट येणार आहे. त्यामुळे शासनाचे नुकसान भरपाई चे अनुदान हे सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यायला हवे होते, तसेच पीक विम्याची 25% आगावु रक्कम ही सरसकट सर्व जिल्हाभर मिळायला पाहिजे होती. परंतु शासनाने अगदी थोड्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मंजूर केले आहे. व पिक विमा ही फक्त 14 महसूल मंडळामध्ये मंजूर केला आहे. हा शेतकऱ्यांवर शासनाकडून झालेला अन्याय आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून निवेदन देण्यात आले.

लातूर जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना अनुदान द्यावे व सर्व महसुल मंडळांमध्ये पिक विमा मंजूर करावा. या मागणीच्या संदर्भाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी तहसील कार्यालय उदगीर समोर शेतकऱ्यासह भव्य रस्ता रोको आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाने शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा मनसे यापुढे अति तीव्र आंदोलन हाती घेवुन शेतकऱ्याना न्याय मिळवुन देण्यासाठी लढत राहील.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संजय राठोड यानी केले. यावेळी तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, शहराध्यक्ष अभय सुर्यवंशी,संग्राम केंद्रे,जब्बार तांबोळी,गुरूदत्त घोणसे,दयानंद डोंगरे,संतोष भोपळे,लखन पुरी, परमेश्वर भोसले,रामदास तेलंगे,रणजित भंडे,बापुराव जाधव,राम कांबळे,गोविंद केंद्रे,राहुल चव्हाण,अजय भंडे, दत्ता कारलेवाड, गणेश किनी, आकाश श्रीमंगले, संतोष बानी, भरत शेल्हाळे,गजानन गवरे आदी शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

About The Author