भाषा ही अभिव्यक्तीचे महत्त्वाचे माध्यम आहे – डॉ पांडुरंग चिलगर

भाषा ही अभिव्यक्तीचे महत्त्वाचे माध्यम आहे - डॉ पांडुरंग चिलगर

अहमदपूर (गोविंद काळे) : व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची ओळख ही त्याच्या भाषेतून होते. पृथ्वीवरील सर्व सजीवांची आपापली भाषा असते, परंतु मनुष्य हा एक मात्र सृजनशील सामाजिक प्राणी आहे की, मानवाने इतर प्राणीमात्रां पेक्षा केवळ सृजनात्मक भाषेच्या बळावर आपला सर्वांगीण विकास केला आहे. भाषेच्या माध्यमातून मनुष्य आपले भाव. विचार आणि ज्ञान आदीं चे संप्रेषण करीत असतो. म्हणूनच भाषा ही अभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे. असे प्रतिपादन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्रा.डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हडोळती येथील कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदी साहित्य मंडळ उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार हे होते तर विचार मंचावर हिंदी विभाग प्रमुख डॉ.सादिक शेख तसेच प्रा.दिगंबर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. पांडुरंग चिलगर म्हणाले की, हिंदी भाषेचे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचे योगदान होते. तसेच, हिंदी साहित्याच्या माध्यमातून व्यक्ती, समाज, राष्ट्रहिताचे चित्रण वेळोवेळी साहित्यकारांनी केले आहे. असेही, ते म्हणाले. यावेळी दर्पण या भितीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ.दीपक बच्चेवार म्हणाले की, हिंदी भाषा आज साता समुद्रापार पोहोचली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या भाषेची लवचिकता,सहजता आणि माधुर्य आहे. हिंदी भाषा जगातील कोणताही भाषा भाषिक सहज आत्मसात करू शकतो, अशी ही भाषा आहे.असे ही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. सादिक शेख यांनी केले. तर, सूत्रसंचालन प्रा. दिगंबर गायकवाड यांनी व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गोविंद शिळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author