वाचनाने जीवन आनंदी,सुंदर, सुसंस्कृत आणि समृद्ध होत – माजी मंत्री बाळासाहेब जाधव
अहमदपूर (गोविंद काळे) : वाचन ही एक चांगली सवय असून, लहान असो मोठा असो प्रत्येकाने ही सवय अंगी बाणली पाहिजे. सुरुवातीला जे आवडेल ते वाचा. वाचनातून काय वाचावे हे समजते. सातत्यपूर्ण वाचनाने माणूस परिपूर्ण होतो. त्याचे जीवन सुसंस्कृत आणि समृद्ध होते , असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित लोकसहभागातून जमा झालेल्या ७५०० ग्रंथांचा ग्रंथार्पण, विविध वाङ्मय मंडळांचे उद्घाटन तसेच भित्तीपत्रकांच्या प्रकाशन सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी हे होते.यावेळी विचारमंचावर अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अयोध्या ताई केंद्रे, सुप्रसिद्ध लेखक समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, ह.भ.प. आशाताई आवाडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, महात्मा फुले महाविद्यालयाने गुणवत्तेच्या बाबतीत विद्यापीठात अव्वल स्थान मिळविले असून प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेऊन नावलौकिक मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांचे नाव या महाविद्यालयाने सार्थक केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापती, लोकनेत्या अयोध्याताई केंद्रे यांच्या वतीने महाविद्यालयास पाच शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. बोलताना त्या म्हणाल्या की महात्मा फुले महाविद्यालयात येताना मला नेहमीच खूप आनंद होतो. कारण हे महाविद्यालय विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम राबविते. त्याचबरोबर खेड्यापाड्यातील मुलांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीत या महाविद्यालयाने मोठे योगदान दिले आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही सुरुवातीला महाविद्यालयातील प्राचार्य,सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी वाचन चळवळ विकसित व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास प्रत्येकी ७५ पुस्तके भेट दिली आणि त्यानंतर अहमदपूर परिसरातील दानशूर व्यक्तींना ग्रंथ दानाचे आवाहन केले आमच्या आहारात आवाहनाला प्रतिसाद देत ग्रंथ दात्यांनी ग्रंथ देऊन वाचन चळवळीला गतिमान केले आहे. या ग्रंथातील ग्रंथांचा लाभ परिसरातील खेड्यापाड्यातील मुला मुलींना निश्चितच होईल असे ते यावेळी म्हणाले. त्यावेळी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी स्वतः एक हजार एकसे एक (११११ ) ग्रंथ भेट दिले. तसेच विद्रोही कवी राजेंद्र कांबळे आणि प्राचार्य तुकाराम हरगिले यांच्या वतीनेही या कार्यक्रमात ग्रंथ भेट देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेतील भित्तीपत्रकांचा प्रकाशन सोहळाही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.