शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार- भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार- भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड

लातूर (प्रतिनिधी) : सततच्या पावसाने व अतिवृष्‍टीने नुकसानीत आलेल्या शेतक-यांना विशेष बाब म्‍हणून लातूर जिल्‍हयातील ३ लाख ४२ हजार ७१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी २९० कोटी रूपये वितरीत करण्‍याबाबतचा आदेश १३ ऑक्‍टोबर २०२२ गुरूवार रोजी काढला असून यामुळे नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारा आदेश काढल्‍याबद्दल राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शेतकऱ्यांच्‍या वतीने भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी जाहिर आभार मानले.मागील काळात सततचा पाऊस होवून अनेक ठिकाणी अतिवृष्‍टी झाली पुरस्थिती निर्माण झाली. यामुळे शेती पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यानुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना मदत करण्‍याची राज्‍यातील शिंदे-फडणवीस सरकारच्‍या वतीने घोषणा करण्‍यात आली होती. २४ तासात ६५ मी.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्‍यास त्‍या महसूल मंडळातील सर्वच गावातील शेती पिकाच्‍या नुकसानीचे पंचनामे करून मदत केली जाते. महसूली मंडळात अतिवृष्‍टीची नोंद नसतानाही मंडळातील कांही गावात अतिवृष्‍टी होऊन शेतीपिकाचे नुकसान होऊ शकते मात्र शासनाच्‍या निकषात बसत नसतानाही विशेष बाब म्‍हणून नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मदत करण्‍याचा राज्‍य शासनाने निर्णय घेतला असल्‍याची माहिती आ. रमेशअप्‍पा कराड यांनी दिली.राज्‍यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्‍मानाबाद, यवतमाळ आणि सोलापूर या नऊ जिल्‍हयातील ८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना ७५५ कोटी ६९ लक्ष रूपयांची मदत करण्‍याचा राज्‍य शासनाने निर्णय घेतला होता. त्‍यानुसार सदरील मदतीचे शेतकऱ्यांना तात्‍काळ वाटप करण्‍याबाबतचा आद्यादेश १३ ऑक्‍टोबर २०२२ गुरूवार रोजी काढला असल्‍याचे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ३ लाख ४२ हजार ७१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी २९० कोटी रुपयाची मदत करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत होणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची निश्चितपणे दिवाळी गोड होणार आहे.

मागील सरकारच्‍या काळात दोन हेक्‍टर पर्यंत जिरायती पिकासाठी प्रतिहेक्‍टर ६ हजार ८००, बागायती पिकासाठी १३ हजार ५०० आणि बहुवार्षीक पिकाच्‍या नुकसानीसाठी १८ हजार रूपयाची मदत केली जात होती असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, शेतकऱ्यांना केल्‍या जाणाऱ्या मदतीची मर्यादा वाढवून राज्‍यात नव्‍याने सत्‍तेवर आलेल्‍या शिंदे- फडणवीस सरकारने तीन हेक्‍टर पर्यंत जिरायती पिकासाठी प्रतिहेक्‍टर १३ हजार ६००, बागायती पिकासाठी २७ हजार आणि बहुवार्षीक पिकाच्‍या नुकसानीसाठी ३६ हजार रूपयाची मदत करण्‍याचा महत्‍वपुर्ण निर्णय घेतला आहे.राज्‍यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा आणि दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे. सततच्‍या पावसामुळे नुकसानीत आलेल्‍या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी दिलासा द्यावा यासाठी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्‍याकडे निवेदन देवून सातत्‍याने पाठपुरावा केला होता. केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश आले असून शंखी गोगलगाईमुळे नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना केलेल्‍या मदतीपाठोपाठ संततधार अतिवृष्‍टीमुळे नुकसानीत आलेल्‍या शेतकऱ्यांना प्रत्‍यक्ष मदत करण्‍याचा आदेश काढल्याबद्दल राज्‍याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस कृषिमंत्री मा. अब्दुलजी सत्तार आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गिरीश महाजन यांचे शेतकऱ्यांच्या वतीने भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी जाहीर आभार मानले आहेत.

About The Author

error: Content is protected !!