भारत जोडो अभियानात हजारो युवा कार्यकर्ते सहभागी होणार – भोपणीकर आणि बागबंदे यांचा विश्वास
उदगीर (एल. पी. उगिले) : काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये येत आहे. या भारत जोडो अभियानात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो युवक सहभागी होतील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे चिटणीस गजानन भोपणीकर आणि कुणाल बागबंदे या दोघांनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण भारत देश अखंड आणि एक संघ यायला पाहिजे. अशा उदात्त हेतूने राहुलजी गांधी यांनी भारत जोडो अभियान सुरू केले आहे.
ही यात्रा कन्याकुमारी ते कश्मीर अशी असून राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय अखंडता अबाधित राखण्यासाठी “हम सबके, सब हमारे” ही भावना ठेवून तसेच देशातील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. वाढती बेकारी आणि महागाई दूर करण्यासाठी ही दुसरी लढाई लढली पाहिजे. असा संदेश घेऊन ही यात्रा संपूर्ण भारतभर निघत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही या दोघांनी केले आहे.
महाराष्ट्रामध्ये नांदेड व देगलूर येथून भारत जोडो अभियान यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रणही यावेळी त्यांनी दिले आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे पाळेमुळे रुजावीत यासाठी लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख, स्व. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर, स्व. शंकररावजी चव्हाण यांच्यासह शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे या दिग्गजांनी मोलाचे योगदान दिले आहे. याची जाणीव ठेवून युवकांनी आपसातील गट, तट असे भेद विसरून भारत जोडो अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीसह अनेक जाणकार आणि अनुभवी नेते मंडळी सहभागी होणार असल्याने भारत जोडो यात्रा ही युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. असाही विश्वास कुणाल बागबंदे आणि गजानन भोपणीकर यांनी व्यक्त केला आहे.