उदगीर शहरातील अतिक्रमणाच्या नोटिसेस आलेल्या लोकांनी एकसंघपणे लढा द्यावा – नीटुरे
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरातील फुलेनगर, गांधीनगर, अशोक नगर या भागातील शेकडो नागरिकांना आपण गायरानावर वसाहत केलेली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत, सदरील जागा दहा दिवसात खाली करावी. अशी नोटीस नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. सदरील बाबी कायदेशीर असल्याने सर्वच नागरिकांनी संघटितपणे या संदर्भात लढा उभारावा. असे आवाहन उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी नीटुरे यांनी केले आहे.
ते फुलेनगर भागातील नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी शशिकांत बनसोडे, दिलीप गायकवाड, संजय दादा गायकवाड, धनाजी सोनकांबळे, बाबुराव कांबळे, रवी गायकवाड, किरण कांबळे, धम्मरत्न भालेराव, बबन तलवारे, व्यंकट कावळे, दिगंबर कांबळे, मुरलीधर सोनकांबळे इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.
पुढे बोलताना राजेश्वर निटूरे यांनी स्पष्ट केले की, गेल्या 40 ते 50 वर्षापासून या भागात लोकांनी वस्ती करून आपली घरे बांधली आहेत. या भागात शासनाच्या वतीने नागरी सुविधा ही पुरवण्यात आल्या आहेत, असे असताना नागरिकांना घरे खाली करा. म्हणणे चुकीचे आहे. असे असले तरीही सदरील नोटीसमध्ये उच्च न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख असल्यामुळे आपल्याला देखील हा लढा संघटितपणे न्यायालयीन आणि आंदोलनात्मक अशा दोन्ही पातळीवर द्यावा लागेल. त्यासाठी गट, तट बाजूला ठेवून राजकारण न करता केवळ लोकांच्या हिताचा विचार केला जावा. असेही आवाहन राजेश्वर नीटूरे यांनी केले आहे.