बोगस आणि बनावट पत्रकारांचा सर्वत्र सुळसुळाट!! पुण्यात तर लुटत सुटलेत भरमसाठ!!!
पुणे (रफिक शेख) : ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चांगुलपणाच्या बाबतीत पुणे तिथे काय उणे? असे म्हटले जात होते. तशाच पद्धतीने आता गुन्हेगारी क्षेत्रात देखील पुण्याने चांगलेच बदनाम होणे सुरू केले आहे.
विशेष म्हणजे समाजामध्ये पत्रकारितेला एक चांगला दर्जा, चांगले नाव आहे. असे समजल्यानंतर काही टुकार प्रवृत्तीने बोगसगिरी करत, आम्हीच खरे पत्रकार! असे सांगत सर्वसामान्य लोकांना, व्यापाऱ्यांना गंडवणे, ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे. तसे बोगस पत्रकारांचे प्रमाण सर्वत्र आढळून येते. साधी एक बातमी लिहिता येत नाही, वर्षातून कधीतरी वृत्तपत्र काढतात, किंवा उगीच मोबाईलवर रेकॉर्डिंग करून आता ही बातमी समाज माध्यमावर किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर फिरवतो, अशी धमकी देणारे महाभाग मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत.
तसा प्रकार मध्यंतरीच्या काळात पुण्यामध्ये मोडून काढण्यात पोलिसांनी चांगलीच भूमिका बजावली होती. मात्र कर्तबगार पोलिसांची बदली होताच, पुन्हा नव्याने अशा बोगसगिरीला सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असाच एक गुन्हा दाखल झाला आहे.
त्यामध्ये पाच तोतया पत्रकारासह एका महिलेचाही समावेश आहे. त्यांच्या विरोधात मुंडवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 282/ 22 कलम 384, 387, 341, 352, 506, 323 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, तेजाराम देवाजी देवासी वय वर्ष 42, हे व्यापारी पुणे येथील मुंढवा परिसरात प्लॉट नंबर 305, सुरेख हाइट्स, लोणकर वस्ती चौक, केशवनगर मांजरी रोड या भागात व्यवसाय करतात. तसे ते मूळचे राजस्थान राज्यातील गुडाजाठाण तालुका देसुरी जिल्हा पाली येथील रहिवासी असल्याने त्यांच्यावर तुमची बदनामी करतो. तुमचा जो व्यवसाय आहे, त्यात भेसळ आहे. तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळता, असे सांगून प्रमोद साळुंखे, वाजिद सय्यद, मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तवर, संजीवनी कदम सर्वजण राहणार पुणे यांनी दीपावलीच्या पूर्व संधेला सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊच्या दरम्यान दत्त कॉलनी लोणकर वस्ती चौक, केशवनगर मांजरी रोड मुंढवा या ठिकाणी राहणाऱ्या फिर्यादी यांच्याकडून संगणमत करून खून करण्याची धमकी देऊन तसेच त्यांना अडकवून ठेवून पाच लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी की, यातील फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, फिर्यादीचे पुणे येथील गोडाऊन मध्ये आरोपी आले, आणि प्रमोद साळुंखे यांनी आपण टाइम्स ऑफ इंडिया व आत्मज्योती या पेपरचे पत्रकार असल्याचे सांगून आमच्या गोडाऊन मध्ये भेसळयुक्त अन्नधान्याची विक्री करून आम्ही दोन नंबरचा धंदा करतो, यापूर्वी गुटख्याच्या विक्री मधून खूप पैसा कमावला आहे.
आता पेपर मध्ये बातमी लावून बदनामी करून पूर्णपणे बरबाद करून टाकतो. जर पैसे दिले नाही तर, संपूर्ण खानदानाचाच खून करून टाकतो. अशी धमकी देऊन तसेच आपल्या मुलाला मारहाण करून पत्नीला व मुलाला गोडाऊन मध्येच अडकवून बाहेर पडण्यासाठी मज्जाव करून तसेच प्रमोद साळुंखे, वाजिद सय्यद यांनी स्वतःसाठी व त्यांचे साथीदार मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंह तवर, व आत्मज्योती पेपरच्या संपादिका संजीवनी कदम यांच्या साठी फिर्यादी कडून पाच लाख रुपये खंडणी घेऊन गेले आहेत.
अशा आशयाची फिर्याद सदरील पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक करपे आणि पोलीस उपनिरीक्षक बिनवडे या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन, रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करपे हे करत आहेत.
पत्रकारांना संरक्षण मिळावे म्हणून काही कायदे आणि काही तरतुदी करण्यात आल्या आहेत, मात्र त्या तरतुदी किंवा त्या कायद्याचा फायदा खरे पत्रकार घेत नसून बोगसगिरी करणारे आणि स्वतःला पत्रकार म्हणउन घेणारे मोठ्या प्रमाणात करत असल्याची तक्रारही सर्रास केली जात आहे. आपल्या वाहनावर प्रेस किंवा कोणत्यातरी मोठ्या पेपरचे नाव लिहून समाजावर व प्रशासनातील अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रकारही अनेक तोतया पत्रकार करत आहेत, अशीही चर्चा सर्वत्र चालू आहे.