बहिःशाल शिक्षण केंद्र सल्लागार समितीवर निवडीबद्दल समीक्षक डॉ. मारोती कसाब यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण केंद्र सल्लागार समितीवर सदस्य म्हणून येथील महात्मा फुले महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक, आघाडीचे कवी, समीक्षक फर्डे वक्ते डॉ. मारोती कसाब यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थी विकास विभागाच्या अंतर्गत बहिःशाल शिक्षण केंद्र चालविले जाते. या माध्यमातून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील गावे आणि शहरातील विविध संस्थांच्या माध्यमातून विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. सामाजिक जाणीव जागृती व प्रबोधनाचा वारसा लाभलेल्या या बहिःशाल शिक्षण केंद्राच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी येथील महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करणारे कवी, समीक्षक तथा चळवळीतले वक्ते डॉ. मारोती कसाब यांची माननीय कुलगुरू महोदयांनी निवड केल्याबद्दल महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी डॉ. कसाब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.