इंग्रज सरकारच्या विरोधात प्रखर लढा उभारणारे पहिले आदिवासी क्रांतिकारक नेते बिरसा मुंडा – डॉ. बब्रुवान मोरे
अहमदपूर (गोविंद काळे) : इंग्रज सरकार ख्रिस्ती मिशनरींच्या सहकार्याने जबरदस्तीने आदिवासी, दलित व इतर समुदायातील लोकांचे धर्मांतरण करीत होते. बिरसा मुंडा यांच्या यांचे वडील सुगन मुंडाचेही इंग्रजांनी धर्मांतर केले. याचा राग बिरसा मुंडांना सहन झाला नाही, म्हणून त्यांनी इंग्रजांच्या या अन्यायाविरुद्ध प्रखर लढा उभारण्याचे कार्य सर्वप्रथम केले. असे, प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.बब्रुराव मोरे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित बिरसा मुंडा यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, डॉ.बब्रुवान मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, बिरसा मुंडा यांनी छोटा नागपूर क्षेत्रामध्ये १८९५ साली इंग्रजांनी विरुद्ध लढा दिला. याबद्दल त्यांना इंग्रजांनी रांची येथील कारागृहात अटक झाली. याच कारागृहात ९ जून १९०० रोजी त्यांचा मृत्यू झाला. ते खऱ्या अर्थाने आदिवासी जन समुदायाचे लोकनेते होते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनीही जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. डी. चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी प्रोफेसर डॉ. अनिल मुंडे, प्रा. अतीश आकडे, डॉ. डी. एन. माने, प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे, डॉ. मारोती कसाब, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.