शेतीपंपाची वीज तोडल्यास महावितरणाच्या कार्यालयात घुसून आंदोलन करू – मनसे
उदगीर (एल.पी.उगीले) : सध्या महावितरण कार्यालयामार्फत उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन कट करण्यात येत आहेत, यापूर्वी खरीप हंगामात झालेल्या सततच्या पाऊस,अतिवृष्टी,गोगलगायीचा प्रादुर्भावामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून या हंगामाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघालेला नाही. त्यामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आला असताना त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असताना, उलट त्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार महावितरण कडून केला जात आहे.
पंधरा दिवसांपूर्वी लेखी नोटीस देणे बंधनकारक असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व नोटीस न देता, वीज कनेक्शन तोडले जात आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाने शेतकऱ्यांच्या शेतीतील वीज न कापण्याचे आदेश दिले आहेत. सध्या खरिपाच्या पेरण्या चालू आहेत. त्यामुळे सध्या शेतीला पाणी दिले जात आहे. यातच महावितरण डीपीचे कनेक्शन खंडित करून शेतकऱ्याकडून वीज बिलाची वसुली शक्तीने करीत आहे. तरी यंदा शेतकरी नैसर्गिक संकटामुळे आडचणीत आला असल्याने महावितरणने सक्तीची वीज बिले वसूल करू नये, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शेतकऱ्यासह महावितरण कार्यालयात घुसून तीव्र आंदोलन करतील. अशा आशयाचे निवेदन उदगीर तहसीलदारांना मनसे कडून देण्यात आले आहे.
या निवेदनावेळी मनसे शेतकरी सेनेचे रामदास पाटील जिल्हा उपाध्यक्ष,बापुराव जाधव तालुकाध्यक्ष,अजय भंडे तालुका उपाध्यक्ष,अशोक मारतळे ,गणेश किने,हरिबा बिरादार,बिरबल मेह्त्रे,प्रदीप दांडगे,भंडे प्रसाद पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होते.