प्रत्येक भारतीयाने संविधानाचा सन्मान करणे काळाची गरज – डॉ. पी.पी. चौकटे
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संविधान हे मानवतेच्या दृष्टिकोनातून जगातील एक सर्वश्रेष्ठ संविधान असून या संविधानाचा प्रत्येक भारतीयशयांनी सन्मान करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. पी.पी.चौकटे यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संविधान गौरव दिन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. चौकटे बोलत होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला केंद्र संयोजक डॉ. अनिल मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे, कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. चौकटे म्हणाले की, भारतीय संविधान हे लवचिक असल्यामुळे प्रत्येक काळाची आव्हाने पेलण्याची क्षमता त्यामध्ये आहे. देशाची एकता आणि अखंडता राखण्यात ते यशस्वी ठरले आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. चौधरी यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये विशद करून प्रत्येक भारतीय नागरिकांनी घरोघरी संविधानाचे वाचन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. तसेच याप्रसंगी मुंबई हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल मुंढे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.