बहुजन समाजातील तरुणांनी राजकारण करताना व्यवहार आणि शिक्षणाला प्राधान्य द्यावे – बाळासाहेब पाटोदे
उदगीर (एल. पी. उगिले) : सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगरपालिकेच्या निवडणुका तर दारातून थांबल्या आहेत, या काळात बहुजन समाजातील तरुणांना वेगवेगळी आमिष आणि भूलथापा देऊन आपलेसे करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष व्यस्त असतो. मात्र बहुजन समाजातील तरुणांनी आपल्या शिक्षणाला आणि व्यवसायाला प्राधान्य देऊनच राजकारणात सक्रिय व्हावे. आपले पाय जमिनीवर असायला हवेत. राजकारण हे व्यवसाय नाही, याचे भान ठेवावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करताना केले.
सध्याच्यास्थितीत राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना संधी असली तरी, शिक्षणाचा अभाव आणि राजकारण म्हणजे पैसे कमावण्याचे साधन, असा एक गोड गैरसमज निर्माण झालेला असल्यामुळे तरुण राजकारणाकडे आकर्षित होत आहेत. राजकारणाला व्यावसायिक दृष्टिकोन मानून काम करत असल्यामुळे राजकारणामध्ये कित्येक चुकीच्या गोष्टी करताना आढळून येत आहेत.
राजकारण करत असताना आपली व्यावसायिक बाजू देखील तितकीच महत्त्वाची आहे. याचे भान ठेवले पाहिजे. अन्यथा राजकारण हे गुंडगिरी आणि अवैध धंद्याचे अड्डे बनले जातील. अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. लोकांच्या अशा प्रवृत्तीमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे. जीतक्या निवडणुका लहान, तितक्या मोठ्या प्रमाणात आपसातील दुश्मनी वाढत जाते. गाव पातळीवर तर छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद वाढतात.
चार दिवसाची निवडणूक होते, मात्र कार्यकर्त्यांमध्ये कायमची दुश्मनी वाढत जाते. हे सर्व टाळले पाहिजे, राजकीय नेते मंडळी युवकांचा वापर करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व नितीचा वापर करतात. याचेही भान बहुजन समाजातील तरुणांनी ठेवले पाहिजे. राजकीय लोकांचा हेतू साध्य करण्यासाठी बहुजन समाजातील लोकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात खेळी खेळली जात आहे. याचीही जाण तरुणांनी ठेवली पाहिजे. असेही आवाहन याप्रसंगी बाळासाहेब पाटोदे यांनी केले आहे.
बहुजन समाजातील तरुणांनी “एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ” या सहकार क्षेत्रातील तत्त्वाला हाताशी धरून समाजाचे भले होईल. असे काहीतरी केले पाहिजे. आपण राजकीय लोकांच्या हातचे भावले बनवून आपले शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान करून घेऊ नये. आपल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जाणिवा प्रकल्प केल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्याला निर्णय घेताना मानसिक सामर्थ्य प्राप्त होईल. आत्मबल प्राप्त होईल. असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. उदगीर येथील राजवाडा लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.