अंबिका रोहीना राष्ट्रीय सलोख्याचे उदाहरण, मुस्लिम भक्ताकडून महाप्रसादाची व्यवस्था
चाकूर (प्रतिनिधी) : चाकूर तालुक्यातील अंबिका रोहिना येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा सुरू आहे. त्यामुळे दररोज महाप्रसाद ही या ठिकाणी भाविक भक्तांसाठी दिला जातो. ज्यामध्ये स्वप्रेरणेने एका मुस्लिम दांपत्याने सप्ताहातील एक दिवसाचा महाप्रसादाचा खर्च उचलून महाआरती देखील केली. एका बाजूला देवी देवतांच्या ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद असताना, अंबिका रोहिना या ठिकाणी मात्र हिंदू आणि मुस्लिम भाविक भक्तांनी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून सर्वांनी मिळून मोठ्या प्रमाणात श्रीमद् भागवत कथा महायज्ञ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
चाकूर तालुक्यातील मौजे अंबिका रोहिना येथे चोवीस नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत युवा राष्ट्रसंत भागवत भास्कर बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरुवात झालेली आहे. ज्यामध्ये रोहिना ग्रामस्थांसहित चाकूर तालुक्यातील गावातील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. यावेळी दररोज महाप्रसादाचे आयोजन ही संयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे. याप्रसंगी बीबेन फकीर साहेब या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीने एक दिवसाच्या महाप्रसादाची संपूर्ण व्यवस्था करून उत्स्फूर्तपणे खर्च उचलला आहे. एका दिवसाला जवळपास पाच हजार भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो. विशेष बाब म्हणजे बिबन फकीर साहेब शेख गावातच मजुरी करून आपली उपजीविका भागवतात. असे असताना देखील भाविक भक्तिच्या प्रेरणेने स्वच्छने हा खर्च करून दांपत्याने महाआरतीही केली. त्यांची ही कृती म्हणजे धार्मिक कार्यात हिंदू मुस्लिम सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन दिसून येणारे आहे. यावेळी हरिहर महाराज दिवेगावकर यांनी त्यांचा सहकुटुंब सत्कार करून त्यांच्या या कृतीचे मोठे कौतुक केले. येथे तीस नोव्हेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने या श्रीमत भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्याचा समारोप होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिना गावातील सर्व नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.