भारताने जगाला विकासाची सर्वांगीन दृष्टी दिली – डॉ. डी.एम. खंदारे

भारताने जगाला विकासाची सर्वांगीन दृष्टी दिली - डॉ. डी.एम. खंदारे

अहमदपूर (गोविंद काळे) : भारत देशाला फार मोठी परंपरा आहे. साहित्य, कला, आयुर्वेद, योगा, विज्ञान या सर्वांचे बीज भारतीय शास्त्र आणि वेदांमध्ये मिळतात. आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात भारताने जगाला नवी सर्वांगीण विकासाची दृष्टी दिली, असे स्पष्ट प्रतिपादन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य तथा व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक दृष्टिकोनातून भारत ‘ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय अंतरविद्याशाखीय परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारताला मिळालेल्या’ जी- 20′ चे अध्यक्षपद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक माधवराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य डॉ. नारायण कांबळे, माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. खंदारे म्हणाले की, भारत जगाचा अध्यात्मिक गुरु तर आहेच त्याचबरोबर वैज्ञानिक विकासाचा गुरुमंत्र ही भारताने जगाला दिला त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर मनुष्य विकास करू शकला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त मनुष्यबळ भारताने जगाला पुरविले आहे, तसेच इतर क्षेत्रांमध्ये ही भारतीय लोक अग्रेसर असल्याचे दिसून येते.असेही ते म्हणाले. यावेळी आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपस्थित असलेल्या प्राध्यापकांमधून प्रातिनिधीक स्वरूपात डॉ. बालाजी गव्हाळे, डॉ. बालाजी डिघोळे, डॉ. बालाजी भंडारे, डॉ. हनुमंत सोनकांबळे यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दल आपले मत व्यक्त केले.

याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत विविध विषयाच्या अभ्यास मंडळावर निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर लक्षेटे यांच्यासह संस्कृत अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. प्रशांत बिरादार, डॉ.अभय पाटील तसेच पाली अभ्यास मंडळ मंडळाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल डॉ. बालाजी गव्हाळे, डॉ. गौत्तम बनसोडे यांचा तसेच अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल डॉ. बालाजी घुटे, इतिहास अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल रमेश गंगथडे तसेच, वाणिज्य अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल डॉ. मारोती कच्छवे, डॉ.काळम पाटील,तर डॉ. बालाजी भंडारे यांना पीएच.डी. पदवी जाहीर झाल्यामुळे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच या समारोप कार्यक्रमाचा अध्यक्ष स्मारक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बब्रुवान मोरे यांनी तर, आभार प्रा. आतिश आकडे यांनी मानले. या परिषदेला महाराष्ट्रसह तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यातून दोनशेहून अधिक प्राध्यापक, संशोधक उपस्थित होते. ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author