येणाऱ्या सर्व निवडणुका रेणापूर तालुक्यात भाजपा स्वबळावर लढवणार – आ. कराड
लातूर (प्रतिनिधी) : आगामी काळात होवू घातलेच्या रेणापूर तालुक्यातील सर्व निवडणुका कोणाशीही युती न करता भारतीय जनता पार्टी स्वबळावर सर्व ताकतीनिशी लढून जिंकण्याचा निर्धार भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रेणापूर तालुका भाजपा कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला.
रेणापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची बैठक सोमवारी सकाळी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी भाजपाचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अभिजीत मद्दे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अनुसया फड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या बैठकीस रेणापूर तालुक्यातील भाजपाचे तालुका, जिल्हा सर्व पदाधिकारी, आघाडी आणि मोर्चाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, राजकीय जीवनात नेता म्हणून उभा राहण्याची संधी मला रेणापूर तालुक्याने दिली आणि लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी लातूर ग्रामीण मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर टाकली. आजपर्यंत मला काय मिळाले यापेक्षा गोरगरिबांना काय देऊ शकलो याचा मी अधिक विचार केला. गावा गावात माझा आमदार निधी आणि शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाच्या विकास योजना मिळवून दिल्या. मात्र केलेल्या कामाची जनजागृती करण्यात आपण कमी पडतोय. येणारा काळ कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे. कोणाशीही भाजपा युती करणार नाही सर्व निवडणुका स्वबळावर कमळाच्या चिन्हावर लढणार आहोत तेव्हा भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिद्दीने कामाला लागावे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती बूथ स्तरापर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले.
भारतीय जनता पार्टीच्या बूथ स्तरावरील भाजपा त्याचबरोबर युवा मोर्चा आणि महिला आघाडी याप्रमाणे तीन प्रकारच्या बुथ कार्यकारिणी एका महिन्यात सर्वसमावेशक करून रेणापूर तालुक्यात भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत करावी. पक्षाच्या बांधणीत महिलांना अधिक प्रमाणात स्थान द्यावे. प्रदेश भाजपाकडून आलेल्या सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबवावेत असे आवाहन आ. कराड यांनी या बैठकीत केले.
राजकीय सध्याची परिस्थिती बाबतचा राजकीय ठराव अभिषेक आकनगिरे यांनी मांडला तर कृषी आणि सहकार ठराव अभिजीत मद्दे यांनी मांडला. उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात सर्व ठरावांना अनुमोदन दिले या बैठकीत विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, तालुका अध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, अनुसया फड यांनी आपले मनोगत व्यक्त करून लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील गावागावात, वाडी तांडयात केवळ आ. रमेशआप्पा कराड यांच्याच माध्यमातून कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला आणि विकासाची कामे झाली असल्याचे बोलून दाखवले. रेणापूर तालुका भाजपाचा बालेकिल्ला असून या तालुक्यात भाजपाचे मताधिक्य वाढविण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे बोलून दाखविले. बैठकीचे सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले.