होतकरू तरुणांना यशस्वी व्यापारी उद्योजक बनवण्यासाठी विलास को-ऑपरेटिव्ह बँक पुढाकार घेणार – ऍड. किरण जाधव
लातूर (एल.पी.उगीले) : सर्वसामान्य परिस्थितीतील होतकरू तरुणांना यशस्वी व्यापारी आणि उद्योजक बनवण्यासाठी विलास को-ऑपरेटिव बँक वेळेत आणि सहजगत्या पतपुरवठा करेल. अशी ग्वाही बँकेचे नूतन अध्यक्ष ऍड. किरण जाधव यांनी दिली.
विलास को-ऑपरेटिव बँकेची विशेष सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षनावरून ऍड. किरण जाधव बोलत होते.या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष ऍड. समद पटेल, संचालक सर्वश्री अनिल बाबाराव शिंदे, सुर्यकांत ज्ञानेश्वर कातळे, व्यकंटेश विश्वाभरराव पुरी, विजय गोविंदराव देशमुख, अरूण लक्ष्मणराव कामदार, अजय ललीतकूमार शहा, डॉ. कल्याण बलभीम बरमदे, उस्ताद सलीम ताज्जमूलहूसेन, प्रा.स्मिता कैलास खानापूरे, डॉ.प्रा.जयदेवी पांडूरंग कोळगे, चंद्रकांत लिंबराज धायगूडे, सुनिल नामदेवराव पडीले, पंडीत कोडींबा कावळे आदी उपस्थित होते.
बँकेच्या संस्थापक अध्यक्ष आमदार अमित विलासराव देशमुख व सभासद मंडळींनी नवीन संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला जाईल. असेही ऍड किरण जाधव यांनी यावेळी बोलताना म्हटले.
ऍड किरण जाधव पुढे बोलताना म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख आणि मांजरा परिवाराचे आधारस्तंभ सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मजूर, लहान व्यावसायिक, लघुउद्योगजक, यांना वेळेत पतपुरवठा करून त्यांच्या जीवनात आर्थिक बदल घडवण्याचा उद्देश ठेऊन विलास को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केलेली आहे. या बँकेचे वटवृक्षात रूपांतर होताना दिसत आहे, बँकेच्या ठेवी २५० कोटीपर्यंत गेल्या आहेत. कर्ज वाटपही चांगले झाले आहे.
बँकेची नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली आहे.बँक चालवण्याची जबाबदारी आता आम्हा नवीन संचालक मंडळावर दिली आहे. बँकेचे अध्यक्षपद माझ्याकडे आले असून उपाध्यक्ष म्हणून आमचे ज्येष्ठ सहकारी ऍड समद पटेल यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. बँकेच्या सर्व सभासदांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे. आम्हाला बिनविरोध निवडून दिले आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सर्वजण सदैव प्रयत्न करणार आहोत. . आगामी काळात अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध केल्या जातील. सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटिव बँक ओळखली जावी, यासाठी सदैव जागरूकता दाखवली जाईल. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी योग्य नियोजन आणि कडक शिस्तीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जो आदर्श निर्माण केला आहे. त्याचे अनुकरण या बँकेच्या कारभारात केले जाईल, असे सांगून विलास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम घडेल,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.विशेष सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र सपाटे यांनी बँकेचा लेखाजोखा मांडला, बँकेच्या मुख्य इमारतीसाठी जागा खरेदी करणे व भाडेतत्त्वावर घेणे यासंदर्भाने ठरावाचे वाचन त्यांनी केले.बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व सभासदांनी टाळ्याच्या गजरात हा ठराव मंजूर केला. खाडगाव ग्रामस्थांच्या वतीने नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
प्रारंभी बँकेच्या सभासदांनी संचालक मंडळ व उपस्थितांचे स्वागत केले, तसेच बँकेचे नवनियुक्त तज्ञ संचालक संजय देविदासराव नीलेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक अधिकारी, कर्मचारी व बँकेचे सभासद उपस्थित होते.