विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत स्थूलत्व जनजागृती व उपचार अभियानास प्रारंभ
जागतिक स्थूलत्व दिनानिमित्त आयोजन
लातूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्यावतीने जागतिक स्थूलत्व दिनानिमित्त आयोजित स्थूलत्व जनजागृती व उपचार अभियानास विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत आजपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत लातूर येथे शालेय आरोग्य शिक्षण, तपासणी व उपचार करण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सचिव डॉ. अश्विनी जोशी, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले व डॉ. विवेक पाखमोडे तसेच रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानांतर्गत लातूर शहरातील यशवंत विद्यालय, निर्मलादेवी काळे विद्यालय, जवाहरलाल नेहरु विद्यालय, सावित्राबाई फुले महानगरपालिका शाळा व ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलमधील एकूण 730 शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, उपचार व समुपदेशन करण्यात आले. यामध्ये 52 विद्यार्थ्यांना स्थूलत्व आढळून आले. त्यांनाही योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी यावेळी शालेय विद्यार्थी व शिक्षक यांना स्थूलत्वासंबंधी कॉमिक गोष्टींचा वापर करुन मुलांना समजेल अशा भाषेत स्थूलत्व प्रतिबंध व आहाराविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. अजित नागांवकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन जाधव, डॉ. विमल होळंबे, सहयेागी प्राध्यापक, समन्वय अधिकारी डॉ. व्यंकटरमणा सोनकर तसेच जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाजसेवा अधिक्षक, पदव्युत्तर व पदवीपूर्व विद्यार्थी, परिचारिका, प्रशिक्षणार्थी व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.