देशमुखांच्या गडीवरून, शिवाजी हुडे यांचा काँग्रेस आणि भाजपला हाबाडा, महाविकास आघाडीचे नेते शिवाजी हुडे !!!
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकात अंतिम टप्प्यात नाट्यमय घडामोडी घडल्या असल्याची रंगतदार चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज परत घ्यायच्या शेवटच्या दिवशी, गेल्या वेळेस माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवलेले, माजी सभापती शिवाजीराव हुडे यांनी दिलीपराव देशमुख यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ऐनवेळी महाविकास आघाडीचे नेतृत्वपद स्वीकारत नवे पॅनल बनवण्याचा घाट घातल्याची चर्चा जोरात चालू आहे.
गोपनीय झालेल्या बैठकीत शिवाजीराव हुडे यांच्या गटाचे आठ आणि काँग्रेसचे आठ असे सोळा संचालक तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे दोन अशा पद्धतीने 18 संचालक घ्यावेत. आणि महाविकास आघाडीचे पॅनल बनवावे, असे ठरल्याची चर्चा आहे.या चर्चेमुळे उदगीर विधानसभा मतदारसंघात राजकीय गणितेच बिघडली असून काँग्रेस प्रणित माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक राजेश्वरराव निटुरे यांच्या पुढाकारातून निवडल्या जाणाऱ्या आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून रानोमाळ फिरून प्रचारासाठी धडपडणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना नाराजी पत्करावी लागेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सुरुवातीपासूनच उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये उदगीर बाजार समितीची चर्चा जोरात होती. 18 जागाच्या निवडणुकांसाठी एकूण 204 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघातून एकूण 11 जागांसाठी 224 अर्ज, ग्रामपंचायत मतदार संघातून चार जागांसाठी 62 जणांच्या अर्ज, व्यापारी मतदारसंघातील दोन जागांसाठी नऊ जणांच्या अर्ज, तर हमाल तोलारी मतदारसंघातील एका जागेसाठी नऊ जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. छाननी मध्ये 180 जणांच्या अर्ज मंजूर तर वीस जणांच्या अर्ज नामंजूर झाले होते. तर तिघांच्या चार अर्जावर आक्षेप असल्याने सुनावणी नंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज नामंजूर केले होते. मात्र त्या अर्जाच्या विरोधात सात नामनिर्देशन पत्र संदर्भात जिल्हा उपनिबंधकाकडे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर सात नामनिर्देशन पत्र मंजूर करून सहा उमेदवार कायम राहिले होते. यामध्ये प्रामुख्याने संस्था मतदारसंघातील कैलास मुरलीधरराव पाटील, रोडगे दयानंद, हूड शिवाजीराव हनुमंतराव, ग्रामपंचायत मतदार संघातील बालाजी विश्वनाथ देमगुंडे, पाटील ओमप्रकाश मल्लिकार्जुन आणि हमाल मापारी मतदारसंघातील सिताराम बाबुराव सोनकांबळे यांचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी वैध ठरवले असल्याने निवडणुकीत रंगत येत आहे, उमेदवारी अर्ज परत घेण्याची 20 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अर्ज परत घेण्यासाठी शेवटच्या दिवशी नेत्याकडून कार्यकर्त्यांची मंनधरणी होत असल्याची चर्चा आहे. एकंदरीत उदगीरच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकात शेवटच्या टप्प्यात झालेला हा बदल अत्यंत धक्कादायक असून भारतीय जनता पक्षाची हवाच गेल्याचेही चर्चा जोरात चालू आहे. तसेच ज्या उमेदीने काँग्रेस सुरुवातीला प्रचार करत होते, ती उमेद आता दिसेल का ? असही प्रश्न निर्माण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने खेळलेली ही खेळी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षासाठी अडचणीची ठरली असून काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते हिरमुसले आहेत. तसेच अनेक निष्ठावंतांना ऐनवेळी डावलले जाणार यामुळे त्यांच्या मनामध्ये असलेली खदखद कशी थांबवणार? हा ही एक प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार अशी चर्चा असताना या राजकीय भूकंपामुळे आता ती चर्चा देखील बंद होण्याची शक्यता आहे. एका अर्थाने शिवाजी हुडे यांच्याविरुद्ध आता विरोधक थांबेल की नाही? अशी चर्चा जोर धरत आहे.
शिवाजीराव हुडे यांनी उदगीरचे राजकारणच बदलून टाकले अशी ही चर्चा रंगत आहे.