डॉ टागोर यांचे भावविश्व उलगडणारी कादंबरी म्हणजे गुरुदेव होय – अमर हबीब
उदगीर (एल.पी.उगीले) : साहसी , त्यागी , प्रेमी, संगीतकार व कवी त्याचबरोबर ज्या गोष्टीला हात लावेल त्याच सोनं करेल असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले आणि परखड भूमिका मांडणारे व्यक्तिमत्व डॉ. रवींद्रनाथ टागोर यांचे भावविश्व उलगडणारी कादंबरी म्हणजे गुरुदेव होय. असे मत जेष्ठ समाजवादी नेते,भूमिपुत्र आंदोलनाचे आयोजक अमर हबीब यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध शेतकरी, उद्योजक प्रा. बाबूराव नवटके यांच्या अध्यक्षतेखाली चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी नियमितपणे घेतल्या जात असलेल्या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या 287 व्या वाचक संवादात प्रसिद्ध साहित्यिक, मुक्त पत्रकार तथा शेतकरी नेते अमर हबीब आंबेजोगाई यांनी प्रा. रंगनाथ तिवारी लिखित गुरुदेव या साहित्यकृतीवर बोलताना अमर हबीब पुढे म्हणाले की, पुरस्कार मिळवणाऱ्या मुळे देश किंवा राष्ट्र घडत नाही तर समाज घडवणाऱ्या प्रतिभावंता मार्फतच देश आणि राष्ट्र घडत असते. असे परखड भूमिका मांडणारे, गीतांजली या कविता संग्रहास जागतिक स्तरावरील सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार मिळवून आपल्या कवित्वाची श्रेष्ठता सिद्ध करणारे रवींद्रनाथ टागोर यांची नलिनी ही कविता देखील जगप्रसिद्ध काव्य असून ज्याच्या लेखणीतून दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत निर्माण झाले, असे जगातील एकमेव कवी, याचबरोबर शैक्षणिक प्रगतीसाठी शांतिनिकेतन संस्थेची स्थापना करून ज्ञानगंगा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे शिक्षण महर्षी, संगीताचे महत्त्व जाणून संगीतात स्वतःची रवींद्र बंदिश (संगीत) निर्माण करणारे संगीतकार, संपत्तीचा वापर सामाजिक वापरासाठी कसा करायचा? ते इतरांना शिकवणारे श्रीमंत आणि सामाजिक कार्य अशा एक नाही अनेक क्षेत्रात गुरुत्व प्राप्त करणारे रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेमभाव, त्यांच्या प्रेमलीला त्या अनुषंगाने अनेक प्रसंग या साहित्यकृती मध्ये मांडले असल्याचे म्हणाले.
यानंतर झालेल्या चर्चेत अर्चना पैके, गुंडप्पा पटणे, मोहन निडवंचे, अभिजित पाटील, आलमले रामभाऊ आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला. शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रा. बाबूराव नवटके म्हणाले की, सर्व सुख उपभोगलेल्या आणि सर्व त्यागी अशा डॉ. रवींद्रनाथ टागोर यांचे भावविश्व उलगडणारी कादंबरी गुरुदेव ही लेखकाने जेवढ्या आत्मियतेने लिहिली, त्यापेक्षा अधिक प्रेमळपणे अमर हबीब यांनी उलगडून दाखवली आहे.
शासकीय दूध डेअरीचे सभागृह उदगीर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले, संवादकांचा परिचय वीरभद्र स्वामी यांनी करून दिला तर आभार मुरलीधर जाधव यांनी मानले.