यशवंत प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांच्या दिंडीने अहमदपूरकरांना केले मंत्रमुग्ध
अहमदपुर ( गोविंद काळे) येथील यशवंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अहमदपूरकरांना केले मंत्रमुग्ध.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील यशवंत प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांच्या वारकऱ्यांची दिंडी शहरातील आंबेडकर चौक, आझाद चौक, सम्राट चौक, पाटील गल्ली या प्रमुख मार्गाने निघाली होती. त्या दिंडीत अनेक टाळ, मृदंगधारी पुरुष, वारकरी, तुलसी वृंदावन असलेल्या स्त्री वारकऱ्यांचा वेश चिमुकल्यांनी धारण केला होता. मुलांनी नेहरू व पायजामा घालून कपाळाला गंध लावून वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता. तर मुलींनी नऊवारी साडी व विविध दागिने परिधान करून डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन वाटेने विठ्ठल नामाचा गजर करीत जाताना अहमदपूरकरांना मंत्रमुग्ध केले.
या दिंडीत काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणींचा वेश परिधान केला होता हे दिंडीतील मुख्य आकर्षण होते.
दिंडीत सुंदर पालखी होती व त्यात विठ्ठल रुखुमाईची मूर्ति ठेवण्यात आली होती. ही पालखी सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होती.
शिक्षकांनीही एकसारखा पांढरा नेहरू व पायजमा घालून कपाळाला अष्टगंध लावून शिस्तीचे प्रदर्शन केले. यामुळे अहमदपुरात पंढरी अवतारल्याचा अनुभव आला.
सदरील दिंडी यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आर. आर. पारशेट्टे यांच्यासह सर्वश्री माधव भोजराज, विलास चापोलीकर, सतीश बिराजदार, आनंद बिरादार, एम.एम. शेख, रवींद्र गेडाम, गणेश मुसळे, सौ. उमा लिमये, संदीप पांचाळ, अश्विनी गौंड, यशवंतराव कोलपुसे, सौ. अनिता राजे, सौ. रेखा जोगदंड, सौ. शिवशक्ती हिपाळे, सौ.भाग्यश्री शेवाळे आदींनी परिश्रम घेतले.