साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात बाल वारकरी दिंडी उत्साहात साजरी

साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात बाल वारकरी दिंडी उत्साहात साजरी

लातूर (प्रतिनिधी) : मुखात विठू नामाचा गजर, हातात भगव्या पताका, डोक्यावर वृंदावन, ज्ञानोबा- तुकाराम-नामदेव-विठ्ठल रुक्मिणी इत्यादी संतांच्या वेशभूषेतील बाल वारकरी, टाळ,मृदंग व विन्याच्या निनादात जय जय राम कृष्ण हरी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, ज्ञानोबा- माऊली- तुकाराम या अभंगासोबत तल्लीन झालेले बाल वारकरी हे सर्व भक्तिमय दृश्य होते आषाढी एकादशीनिमित्त आयोजित साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाने काढलेल्या दिंडीतील विठ्ठल-रुक्मिणी पालखीचे.

साने गुरुजी माध्यमिक विद्यालय,अवंती नगर,लातूर येथे प्रति वर्षाप्रमाणे बुधवार, 28 जुन 2023 रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढत परिसरामध्ये भक्तीमय वातावरण तयार करून वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठरायाला स्मरण करण्यात आले.

दिंडीची सुरुवात संस्था सचिव कालिदास माने यांच्या शुभ हस्ते व शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख आय.एच. यांच्या उपस्थितीत पालखीचे विधिवत पूजन व विठ्ठल रुक्मिणी झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पहार अर्पण करून करून करण्यात आली.

एरवी शाळेच्या गणवेशात दिसणारी मुलं-मुली आज मात्र पांढरा नेहरू, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ तर नऊवारी साडी, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि “विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूख हर” या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन झालेले बाल वारकरी आज शाळेत अवतरत जणू पंढरीच्या वारीची आठवण करून देत होते. सोबत पर्यावरण संवर्धन, मुलगी वाचवा-मुलगी शिकवा, प्रदूषण टाळा, झाडे लावा- झाडे जगवा, पाणी आडवा-पाणी जिरवा तथा शिक्षणाची गरज या सामाजिक विषयावर घोषणा देत सामाजिक जनजागृतीही करत होते. दिंडी अवंती नगर, कुलस्वामिनी नगर, सोना नगर या शाळेच्या परिसरातून जात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पसायदानाने समारोपीत करण्यात आली.याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासाठी डिगोळे गंगाधर, कावळे स्मिता, परळे गणेश, धोत्रे वैभव, गायकवाड राहुल, सचिन माने, कोयले हरिदास, जगताप शिवगंगा, काळगापुरे कमल, यादव मिनाक्षी, पवार शशिकांत, डोनगावे कोमल, गायकवाड सतीश, पवार अमोल, पाटील सुनंदा, वडवळे नवनाथ, दयानंद लहाडे, बनसोडे पोर्णिमा, सूर्यवंशी भरत, जाधव सत्यपाल, सचिन जाधव, पांचाळ सुर्यकांत आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

About The Author