सदाशिव पेठेतील घटनेतून धडा, आता गुन्हेगारांची खैर नाही; पुण्यात पोलिसांचा मोठा निर्णय

सदाशिव पेठेतील घटनेतून धडा, आता गुन्हेगारांची खैर नाही; पुण्यात पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे (प्रतिनिधि) : रात्री उशिरा घरी जाणाऱ्या महिला यांच्यावर शहरात हल्ले होऊ लागल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदाशिव पेठेत मंगळवारी तरुणीवर झालेल्या हल्ल्यावेळी पेरूगेट पोलिस चौकीसह अन्य पोलिस चौक्या बंद असल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरातील सर्व पोलिस चौक्या २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी घेतला आहे. तरुणी आणि महिलांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी तसेच विनयभंगासारखे गुन्हे टाळण्यासाठी दामिनी पथकांची संख्या १५ वरून आता ४० करण्यात येणार आहे; तसेच बीट मार्शलची संख्या शंभरहून दोनशे करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी बुधवारी दिली.सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यावेळी पेरूगेट पोलिस चौकीसह अन्य पोलिस चौक्या बंद असल्याचे दिसून आले होते. या मुद्द्यावरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर सर्व पोलिस चौक्या २४ तास सुरू ठेवण्याचा आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी दिला आहे. उपस्थिती दर्शविण्यासाठी पोलिसांना छायाचित्र पाठवावे लागणार आहे. शाळा आणि कॉलेजसाठी बाहेर पडणाऱ्या तरुणी, कार्यालयातून रात्री उशिरा घरी जाणाऱ्या महिला यांच्यावर हल्ले होत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाआहे. सदाशिव पेठेतील हल्ला, दर्शना पवार खून प्रकरण, रिक्षेत महिलेचा विनयभंग अशा घटना घडल्याने दामिनी पथक आणि बीट मार्शलची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस, अभ्यासिका तसेच गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक आणि बीट मार्शल गस्त घालणार आहे. बीट मार्शलला सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रात जबाबदारी देण्यात येणार आहे. नाकाबंदी करून संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.महिला तसेच सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. दामिनी पथक आणि बीट मार्शलची संख्या वाढविण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालये येथे तक्रारपेटी ठेवण्यात येणार आहे. स्थानिक पोलिसांकडून तेथे वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. सर्व पोलिस चौक्या २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहेत.असे रितेशकुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी सांगितले आहे.

About The Author