करीयर साठी विद्यार्थ्यानी दुग्ध तंत्रज्ञान शाखेची निवड करावी – प्रा. डॉ. अनिल भिकाने
उदगीर (एल.पी.उगीले) : दुग्ध प्रक्रिया क्षेत्रात नौकरीच्या व उद्योगजकतेच्या विपूल संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यानी करीयर साठी दुग्ध तंत्रज्ञान शाखेची निवड करावी.असे आवाहन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण प्रा. डॉ. अनिल भिकाने यानी केले. ते उदगीर येथील दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयत आयोजित “दुग्ध, पशु, मत्स्य विज्ञान क्षेत्रात विस्तार कार्याचे महत्व” ह्या एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी त्यानी शिक्षणात विस्तार कार्याचे महत्व याविषयी दुग्ध तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तदनंतर त्यांच्या शुभ हस्ते “दुग्धतंत्रज्ञान शाखेतील शिक्षण व भविष्यातील नौकरी/व्यवसाय संधी” या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. माधव पाटील, सहयोगी अधिष्ठाता,दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय,उदगीर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दुग्ध तंत्रज्ञान शाखेकडे गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी सदर घडीपत्रिकेस जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. श्रीकांत कल्याणकर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रविण सावळे यांनी केले.तर सुत्रसंचलन ऋषीकेश पगार या विद्यार्थीनीने केले.आभार प्रदर्शन डॉ. नितिन शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात प्राध्यापक नितीन खोडवे, महेश देशमुख व इतर कर्मचारी उपस्थित होते.