छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम; नागरिकांनी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन
‘बीएलओ’ आजपासून घरोघरी जावून करणार मतदारांची पडताळणी
लातूर (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ मतदारांच्या घरोघरी जाऊन माहितीचे संकलन व पडताळणी करणार आहेत.
मतदारयादीत नाव नसलेल्या आणि 1 जानेवारी 2023 रोजी पात्र असलेल्या नागरिकांची नाव नोंदणी, 1 जानेवारी 2024 रोजी पात्र होणारे संभाव्य मतदार, त्यानंतरच्या तीन पात्रता तारखांना पात्र होणारे संभाव्य मतदार, दुबार नोंदी किंवा मृत मतदार किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीमध्ये दुरुस्ती आदी कार्यवाही या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. सर्व मतदारांनी, नागरीकांनी यासाठी बीएलओ यांना आवश्यक सहकार्य करावे, असे अवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी शोभा पुजारी यांनी केले आहे.