मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 3 आरोपींना मुद्देमालासह अटक
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील जबरी चोऱ्या करून विशेषतः नागरिकांच्या हातातील मोटरसायकली, मोबाईल फोन घेऊन पळ काढणाऱ्या तीन आरोपींना मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली असून पाच लाख 66 हजाराच्या जवळपास ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, काही दिवसांपूर्वी अनोळखी आरोपींनी पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत एकास अडवून जबरीने त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेऊन पळून जाण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे 392, 34 भादवि या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे बाबत आदेशित करून सूचना केल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले.
सदर पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान दिनांक 21/07/2023 रोजी पोलीस पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आरोपी नामे प्रसाद अंगद कांबळे, (वय 19 वर्ष, राहणार साईबाबा नगर, लातूर),आयान अफजल शेख, (वय 19 वर्ष, राहणार कपिल नगर, लातूर), ऋषीनाथ बाबुराव गांधले, (वय 20 वर्ष, राहणार कपिल नगर, लातूर.)
यांना लातूर शहरातील आदर्श कॉलनी परिसरात त्यांनी चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत असताना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या आणखीन चार अल्पवयीन साथीदाराच्या साह्याने मोटर सायकल वरून तसेच पायी जाणाऱ्या इसमाना अडवून त्यांच्याकडील मोबाईल जबरीने लुटले आहे, असे कबूल करून ताब्यातील चोरलेले एकूण 30 मोबाईल गुन्हे करताना वापरलेल्या तीन मोटरसायकली असा एकूण 5,66,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरच्या आरोपी कडून जप्त केलेल्या मुद्देमालावरून व विविध ठाण्याचे अभिलेख तपासले असता पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील जबरी चोरीचे 4 गुन्हे तर पोलीस ठाणे एमआयडीसी येथील जबरी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आलेले आहेत पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार हे पोलीस करत आहेत.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे चे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पोगुलवार, पोलीस अंमलदार संजय कांबळे, युवराज गिरी, बालाजी कोतवाड, काकासाहेब बोचरे, पद्माकर लहाने, मिलिंद कांबळे यांनी केली आहे.