सत्संग आनंदाचा पाया व सिद्धीचे फळ; ह.भ.प गुरुबाबा महाराज औसेकर यांचे मार्गदर्शन

सत्संग आनंदाचा पाया व सिद्धीचे फळ; ह.भ.प गुरुबाबा महाराज औसेकर यांचे मार्गदर्शन

शंभुउंबरगा : “संत संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो”, असे म्हणतात. माणसाला चांगल्याची संगत परमार्थात नि प्रपंचात ही महत्त्वाची आहे. संत संगतीसाठी घर सोडून बाहेरच जायला हव, असं नाही, तर संतांच्या ग्रंथाचे वाचन, मनन, चिंतन ही सत्संगतीच होय. सत्संगाशिवाय विवेक नाही आणि विवेकाशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. मानवी जीवनामध्ये सत्‍संगाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. सत्संग हा आनंदाचा पाया आहे. साधन-सिद्धींचे फळही आहे. संत संगतीने जीवनाचे कल्याण होते. असे प्रतिपादन नाथ संस्थानाचे पिठाधिश ह.भ.प गुरूबाबा महाराज औसेकर यांनी केले.
श्रीक्षेञ शंभु महादेव देवस्थान शंभु उंबरगा येथे अधिक मासा निमित्त चालु असलेल्या अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळा आयोजीत सत्संगात तीसर्‍या दिवशी त्यांचे प्रवचन झाले .पुढे बोलताना गुरुबाबा महाराज औसेकर म्हणाले की, सत्संग म्हणजे सत्याचा मार्ग अवलंबणे होय. महापुरुषांचा संत्सग, विवेक प्राप्त होण्यासाठी सत्संग, विवेक नसेल ते जीवन पशुतुल्य आहे. खऱ्या संतांची संगत लाभली तर मनाच्या वेगाने भगवंताकडे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. सत्संगामध्ये भक्त आणि भगवंत यांचे पवित्र नाते जोडण्याचे कार्य घडते.दानवाचे मानवात आणि मानवाचे देवात रूपांतर करण्याचे महत्वाचे कार्य सत्संग करतो.
सत्संग हे आध्यात्मिक मंदिर असून मानवी जीवनाला आत्मिक सुख देणारे एक ज्ञानाचा परिपूर्ण भांडार आहे. संतांच्या संगतीमुळे ब्रह्मज्ञान प्राप्त होते. संतांच्या संगतीत भगवंतांची प्राप्ती होते. कारण संत सतत त्याच्या नामाचे उच्चारण करत असतात. असेही ह.भ.प गुरुबाबा महाराज यांनी यावेळी सांगितले.
या परमरहस्य पारायण सोहळ्यास सुमारे २१०० पुरुष, महिला भावीक पारायणास बसले असुन येत्या रविवारी सप्ताहाची सांगता होणार आहे. पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी सत्संगाचा लाभ घ्यावा. असे मंदिर समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

About The Author