जिल्हा निर्मितीसह विकास कामे व संघटन बांधणी संदर्भात ना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा :- माजी आ. भालेराव
उदगीर (एल. पी. उगीले) : गेल्या कित्येक वर्षापासून उदगीर विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील नागरिकांची उदगीर जिल्हा व्हावा. अशी आग्रही मागणी आहे. विद्यमान स्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्यात आणि केंद्रात सरकार असल्यामुळे राज्य सरकारने उदगीरला जिल्हा जाहीर करून विकासासाठी गरज असेल तर केंद्र शासनाकडूनही निधी घेऊन उदगीरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी आग्रही मागणी माजी आमदार सुधाकर भालेराव आणि उदगीर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रीतसर चर्चा केली.
उदगीर विधानसभा मतदारसंघातील आणि उदगीर शहरातील काही उड्डाणपूलांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या कार्यकाळात प्रशासकीय मंजुरी मिळालेले उदगीर शहरातील समता नगर कडे जाणाऱ्या रोडवर शेतकी निवास जवळ तसेच मलकापूर हद्दीत वळण रस्त्याजवळ, शेल्हाळ हद्दीमध्ये रेल्वे पटरी वरील रस्त्यावर, उदगीर शहरातील संतोषी माता नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल व्हावेत अशा पद्धतीचे आग्रही मागणी तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांनी केली होती आणि त्याला मान्यताही मिळाली होती. मात्र तांत्रिक कारणाने ती प्रलंबित राहिली होती. त्या कामांना गती देऊन इतरही विकास कामे करण्यासंदर्भात या शिष्टमंडळाने चर्चा केली.
याप्रसंगी माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बसवराज पाटील, धरमपाल दादा नादरगे, भारतीय जनता पक्षाचे उदगीर तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे, जळकोट तालुका अध्यक्ष राजेंद्र केंद्रे, उदगीर शहराध्यक्ष मनोज पुदाले,माजी नगरसेवक विधीज्ञ दत्ता पाटील, माजी नगरसेवक सावन पस्तापुरे, तोंडार चे माजी सरपंच माधव पटवारी, प्रा. मनोहर नावंदे, रामेश्वर पवार, अमर शेख, राम जाधव, गणपतराव जाधव, धनराज बिरादार, राजू पाटील, माधव टेपाले, शिवाजी भोळे, लक्ष्मण जाधव, नवज्योत शिंदे, शिवशंकर धुपे, शंकर रोडगे, भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तराताई कलबुर्गे, जिल्हा सरचिटणीस शामला कारामुंगे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य उषाताई रोडगे, उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजकुमार देशमुख, माधव मोरे, लखन कांबळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उदगीर विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात उदगीरचे आमदार हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीत कॅबिनेट मंत्री असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकासाची कामे व्हावीत, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये स्थानिक पातळीवर झालेली चलबिचल या अनुषंगाने ही अनेक कार्यकर्त्यांनी ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचार मांडले. सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना ना. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, भारतीय जनता पक्ष कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. कार्यकर्ता हाच भारतीय जनता पक्षाचा पाठीचा कणा असून तीच ऊर्जा असल्याने कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच सर्व निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असेही सांगितले. विकास कामांच्या संदर्भात आणि जिल्हा निर्मितीच्या संदर्भात सकारात्मकता दाखवत आपण यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांच्याकडून मिळाले असल्याचे या शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्यामुळे काही प्रमाणात गाव पातळीवर अनेक कार्यकर्त्यांची गोची होत असून त्यांची अवहेलना होण्याची शक्यता ही याप्रसंगी चर्चिली गेली. या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर समन्वय साधून कामे करावीत, असा सल्लाही ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्याचे समजते.
या शिष्टमंडळाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याचे समजते. एकंदरीत माजी आमदार सुधाकर भालेराव आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास, उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल. असा विश्वास उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेला निर्माण झाला आहे.