लातूर शहरातील वाहतुकी संबंधित समस्यावर उपाययोजनासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपल्या कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे अध्यक्षतेखाली लातूर शहरातील वाहतूक संदर्भातील समस्या व त्यावरील उपाययोजना अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक पार पडली. सदर बैठकीस लातूर महानगरपालिकाचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, महानगरपालिका उपायुक्त मयुरा सिंधीकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, महानगर पालिकाचे अतिक्रमण विभाग प्रमुख, लातूर वाहन परिवहन विभाग प्रमुख, व टोइंग कंत्राटदारचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीत खालील महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली व तात्काळ उपाययोजना करण्याबाबत ठरले आहे.
टोइंग व्हॅन वरून स्पीकर द्वारे प्रथम उद्घोषण करावे व त्यानंतर सदर वाहनावर कार्यवाही करावी.
नागरिकाकडून चुकीच्या दंडाची वसुली व दंडवसुली, कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तुणकीबद्दल तक्रार करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाचे वतीने मोबाईल नंबर दर्शवणारा बोर्ड लावावा.
शहरातील वाहनाची वाढती संख्या लक्षात घेऊन नवीन वाहतूक धोरण आखणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मजुराची थांबण्याची व्यवस्था लावावी. बांधकाम गुत्तेदार/ मुकादम यांची बैठक घेऊन लेबर कमिशनर यांच्या उपस्थितीत त्यांची थांबण्याची जागा निश्चित करावी.
गांधी मार्केट येथील पार्किंग चालू करणे तसेच जुने भाजी मार्केट स्वच्छ करून कार्यान्वित करणे.
विनापरवाना बॅनर लावणारे व तसे बॅनर छापणारे या दोघांवर कायदेशीर कारवाई करणे.टोइंग व्हॅन वर दंडात्मक कारवाईचे दर असलेले बॅनर पोस्टर लावावे.
टोइंग व्हॅन वरील कर्मचारी यांनी स्वच्छ गणवेशात राहावे.केस/दाढी वाढलेली नसावी, रात्रीच्या वेळी स्वयंप्रकाशित गणवेश रिफ्लेक्टर जॅकेट याचा वापर करावा.
शहरात ठीक ठिकाणी पार्किंग व नोपार्किंग झोन बनवून त्याचे बोर्ड लावावेत.टोइंग दंडाचे रकमेबाबत बोर्ड लावावेत व पार्किंग बाबत दुचाकी व चार चाकी वाहनासाठी पिवळे पट्टे आखून घ्यावेत.
वाहनास लागलेले जामर तोडणारे किंवा घेऊन जाणारे वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,या प्रमाणे लातूर शहरात वाहतूक संबंधाने तात्काळ कारवाई करण्याचे ठरले असून वाहतूक नियमन व उपाययोजना अनुषंगाने टोइंग व्हॅन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे बाबत सूचित करण्यात आले आहे.