मोटारसायकल चोरीतील 3 सराईत गुन्हेगारांना अटक,चोरलेले नऊ क्विंटल सोयाबीनसह 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत चोरीस गेलेल्या मोटरसायकल आणि सोयाबीनचा छडा लावून तब्बल चार लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्या करिता पोलीस अधिकारी व अमलदारांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते.त्याअनुषंगाने सदर पथके मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याच्या माहितीचे संकलन करून तपास करीत असताना दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, लातूर शहरातील गरुड चौक परिसरात काही व्यक्ती अगदी कमी पैशात मोटरसायकल विक्री करण्याच्या प्रयत्न करीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक गरुड चौक येथे पोहोचून कमी किंमतीत मोटार सायकल विक्री करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तीन इसमांना दोन मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांचे नाव दशरथ यादव सूर्यवंशी, (वय 27 वर्ष, राहणार हेंळब, तालुका देवनी जिल्हा लातूर),
गजानन प्रल्हाद रणक्षेत्रे,( वय 26 वर्ष, राहणार कुमठा, तालुका उदगीर जिल्हा लातूर),रवी शिवाजी सूर्यवंशी/गायकवाड (वय 29 वर्षे, राहणार लोहारा तालुका उदगीर. सध्या राहणार प्रकाश नगर,लातूर)
असे असल्याचे सांगून त्यांच्या ताब्यातील मोटरसायकली बाबत विचारपूस करून माहिती घेतली असता सदरच्या मोटरसायकली पोलीस ठाणे देवणी व शिरूर आनंतपाळ येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे आणखी तपास केला असता त्यांनी काही महिन्या पूर्वी उदगीर तालुक्यातील नावंदी गावातील एका घरातून 14 कट्टे सोयाबीन चोरी करून ते सोयाबीन लातूर मार्केट यार्डात एका दुकानदाराला विक्री केल्याचे सांगितले. नमूद सोयाबीन चोरी बाबत पोलीस ठाणे वाढवणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीचे सोयाबीन खरेदी केलेल्या आडत व्यापाऱ्याचा शोध घेऊन त्यांने स्टॉक करून ठेवलेले चोरीचे नऊ क्विंटल सोयाबीन त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे .
नमूद आरोपींकडून चोरीच्या 2 मोटार सायकली व नऊ क्विंटल सोयाबीन, चोरलेल्या सोयाबीनची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण किंमत 4 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल नमूद आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.मोटारसायकल चोरीचे पोलीस ठाणे देवणी,शिरूर अनंतपाळ येथील 2 गुन्हे व पोलीस ठाणे वाढवणा येथील सोयाबीन चोरी संबंधात दाखल असलेला एक गुन्हा असे एकूण 03 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
यातील आरोपी दशरथ यादव सूर्यवंशी,( वय 27 वर्ष, राहणार हेळंब तालुका देवनी), हा अट्टल सराईत गुन्हेगार असून लातूर जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन मधील विविध गुन्ह्यात फरारी आहे.
पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपींना पोलीस ठाणे वाढवणाच्या ताब्यात देण्यात आले असून वाढवणा पोलीस पुढील तपास करीत आहे,सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, चंद्रकांत केंद्रे यांनी पार पाडली.