कला, साहित्य आणि संगीत माणसाला जगण्याची नवी उभारी देतात : संतोष राम
उदगीर (एल पी उगीले) भरपूर पैसा, प्रसिद्धी आणि यश मिळूनही आज अनेकजण नैराश्याच्या विळख्यात सापडून आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे वळताना दिसतात. अशा वेळी चित्रपट, संगीत, कला आणि साहित्य माणसाला जगण्यासाठी नवी प्रेरणा, ऊर्जा आणि जगण्याचा अर्थ देतात. त्यामुळे जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन, संगीत आणि कलेची आवड जोपासणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक संतोष राम यांनी केले. ते जिव्हाळा ग्रुपतर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथराव माळेवाडीकर होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिव्हाळा ग्रुपच्या वतीने पांडुरंग बोडके व मान्यवरांच्या हस्ते संतोष राम यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
डॉ. अनिल भिकाने यांनी गौरवपर भाषणात संतोष राम यांच्या कार्याचा वेध घेताना सांगितले की, डोंगरशेळकी -उदगीरचे सुपुत्र असलेले संतोष राम हे पुणे–मुंबई येथे कार्यरत मराठीतील संवेदनशील दिग्दर्शक व पटकथा लेखक आहेत. वर्तुळ, गल्ली, प्रश्न आणि द स्टोरी ऑफ युवराज अँड शहाजहान या त्यांच्या गाजलेल्या लघुपटांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत विशेष ठसा उमटवला आहे. वर्तुळने ५६ हून अधिक महोत्सवांत १३ पुरस्कार, प्रश्नने ३७ महोत्सवांत १४ पुरस्कारांसह आंतरराष्ट्रीय गौरव मिळवला, तर द स्टोरी ऑफ युवराज अँड शहाजहानचा ऑस्कर-पात्रता असलेल्या तसवीर चित्रपट महोत्सवात जागतिक प्रीमियर झाला.
ग्रामीण वास्तव, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक भान यांचे प्रभावी, वास्तववादी चित्रण ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
विश्वनाथराव मुडपे यांनी शुभेच्छापर भाषणात सांगितले की, चंदेरी दुनियेत टिकून राहण्यासाठी प्रखर स्पर्धेला सामोरे जावे लागते; मात्र संतोष राम यांनी आपल्या कल्पकतेने, सृजनशीलतेने आणि जिद्दीने या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केली आहे. डोंगरशेळकीच्या उजाड माळरानावर वाढलेले संतोष राम आज चंदेरी दुनियेत पळसासारखे बहरत आहेत, अशा शब्दांत डॉ. अनिल भिकाने यांनी त्यांचा गौरव केला.
अध्यक्षीय समारोपात विश्वनाथराव माळेवाडीकर यांनी संतोष राम यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथराव मुडपे, पांडुरंग बोडके, बाबुराव वाघमारे आणि अशोक हळळे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मोहनराव खिंडीवाले, षणमुखानंद मठपती, शरणाप्पा खेळगे, दशरथ शिंदे, डॉ रमेश बिरादार, प्रा. दीपक पाटील, मनोहरराव कुलकर्णी, नवनाथ पाटील, अशोकराव बिरादार, शंकरराव साबणे, सोपानराव माने, अमृतराव देशपांडे, वैजनाथ पंचगल्ले , हावगीराव आचारे, संजय कानगुले आदींसह जिव्हाळा ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
