अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेध मोर्चासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेध मोर्चासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

उदगीर (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये मराठा समाजाला शैक्षणिक नौकरीत आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मनोज जरंगे यांच्यासह गावातील आबालवृद्ध, महिला, लहान मुले यांनी सनदशीर मार्गाने उपोषण सुरू केले होते. मात्र या आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी बेछूट लाठी चार्ज करून अनेकांना रक्तबंबाळ केले. निरापराध लोकांना बदडून काढले. या कृतीचा निषेध करून लाठी चार्ज करणाऱ्या आणि तसा आदेश देणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. या प्रमुख मागणीसाठी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये अनेक राजकीय पक्ष, अनेक जाती धर्माचे, विविध संघटनांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्राधान्याने माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उपसभापती रामराव बिरादार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अनिता जाधव, संभाजी ब्रिगेड च्या सुविद्या घोनषीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र कापूस फेडरेशनचे संचालक भरतभाऊ चामले, बिपिन जयंतराव पाटील, युवा मोर्चाचे बाळासाहेब पाटोदे, एम आय एम चे नेते सनाउल्ला खान, मौलाना नौशाद कासमी, काँग्रेसच्या उषा कांबळे, राष्ट्रवादीच्या दिपाली औटे, सतीश पाटील मानकीकर त्यांच्यासह एम आय एम, काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, लोकभारती, भीमशक्ती या संघटनेचेही कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निषेध मोर्चा प्रमुख रस्त्यावरून निघून उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात मराठा समाजाला आरक्षण द्या. आंदोलकावर अमानुष लाठी चार्ज करणाऱ्यांना निलंबित करा. जालना जिल्ह्यातील अमानुष लाठी चार्ज करणाऱ्यांची कसून चौकशी करा, आंदोलकावर केलेले गुन्हे परत घ्या, लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. पिक विमा त्वरित मंजूर करा. विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे अशा पद्धतीच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले मराठा क्रांती मोर्चा च्या नावाने हे निवेदन देण्यात आले या निवेदनावर शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शासनाने सखोल चौकशी करावी. या घटनेचा सर्वांनीच तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

उदगीर शहरात निघालेल्या या निषेध मोर्चाला सर्व जाती-धर्माच्या लोकांनी पाठिंबा दर्शवून सक्रिय सहभाग नोंदवला, याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने मदन पाटील नेत्रगावकर यांनी या मोर्चात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.

About The Author