जालना जिल्ह्यातील लाठीचार्ज विरोधात ग्रामीण भागातूनही कडकडीत बंद
उदगीर (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केल्यामुळे, मराठा समाजामध्ये संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. गृहमंत्र्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश होऊ लागला आहे. उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील ठीक ठिकाणी निषेध रॅली काढून, गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. यामध्ये व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून या रॅलीला प्रतिसाद दिला.
उदगीर तालुक्यातील हेर येथे सर्व जाती धर्माच्या लोकांनी या निषेध रॅलीमध्ये सहभाग नोंदवत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. निषेध रॅलीचे सभेत रूपांतर झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी सरकारच्या धोरणावर आणि या घटनेबद्दल उदासीनता दाखवत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. हेर येथील मराठा बांधवांनी आवाहन केल्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता समाज एकत्र जमला होता. काळ्या फीती बांधून गावातून निषेध रॅली काढण्यात आली. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून, स्वयंस्फूर्तपणे पूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळला. मराठा समाजाची ही निषेध रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन त्या ठिकाणी संतप्त घोषणा दिल्या.
याप्रसंगी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बळवंत घोगरे, नाना ढगे, योगेश घोगरे, वसंत ढगे, तानाजी माटेकर, लक्ष्मण गुराळे, चंद्रकांत माटेकर, युवराज ढगे, स्वरूप ढगे, शिवबा माटेकर, सतीश गायकवाड, संतोष गायकवाड, कार्तिक स्वामी, उमाकांत घोगरे, भागवत गुराळे, तुकाराम घोगरे, जोतिबा शिंदे, संग्राम शिंदे, देवानंद भोसले, अक्षय भोसले यांच्यासह अनेक मान्यवर या निषेध रॅलीत सहभागी झाले होते. अत्यंत शांततेने आणि लोकशाही मार्गाने ही निषेध रॅली काढण्यात आली. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून उदगीर ग्रामीण पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.