पावसातही राष्ट्रवादीचे धरणे आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
उदगीर (प्रतिनिधी) : रात्रीपासूनच उदगीर शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असताना देखील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या) वतीने जाहीर केलेल्या धरणे आंदोलनास मराठा समाजाच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत यशस्वी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे धरणे आंदोलन सकाळी दहा वाजता सुरू झाले होते. दरम्यान शहरातील बाजारपेठ आणि बस वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन देऊन अत्यंत शांततेच्या मार्गाने चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनास हिंसक वळण देत लाठी चार्ज करणाऱ्या जालना जिल्ह्यातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. अशा मागणीसह इतरही मागण्या करणारे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्राधान्याने उदगीर विधानसभा मतदारसंघात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने सरसकट पीक विमान मंजूर करण्यात यावा. दुष्काळामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. ज्यांनी शुल्क भरले असेल त्यांना ते शुल्क परत करण्यात यावे. सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे. दुष्काळी परिस्थितीमुळे सरसकट मोफत धान्य देण्यात यावे. उदगीर शहरात दररोज नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात यावा. उदगीर तालुक्यात चारा छावण्या उभा करण्यात याव्यात, ज्या भागात जनावरांना लंपी रोगाची लागण होत आहे, त्या भागात तात्काळ शेतकऱ्यांचे पशुधन रक्षण व्हावे म्हणून लसीकरण करण्यात यावे. उदगीर शहरात स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहेत, त्या संदर्भात काळजी घेऊन जनतेचे आरोग्य रक्षण करावे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत इत्यादी मागण्या केल्या आहेत. सदरील निवेदनावर माजी आमदार शिवराज तोंडचीरकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे ,नगरपालिकेचे माजी सभापती गजानन सताळकर ,शंकरराव मुक्कावार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ हाडोळे, ज्ञानेश्वर पाटील, धनराज बनसोडे ,नामदेव भोसले, कैलास प्रकाशराव पाटील, विष्णुकांत राजगौड, अभिजीत सोमवंशी ,अण्णासाहेब बनशेळकीकर, रोहिदास कलवले, शिवाजी राजे केंद्रे ,संतोष बिराजदार, अजय शेटकार, व्यंकटराव पाटील अव्वलकोंडकर, अजीम दाईमी, प्रेम तोगरे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करत, सखोल चौकशीची मागणी केली आहे.