अहमदपूर शहरातून भव्य रॅली काढून शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन
मराठा आरक्षण आंदोलन ;शहरातील शाळा, महाविद्यालये , बाजारपेठ, वाहतूक कडकडीत बंद.
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, समाज बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावे, सकल मराठा समाजावर गोळीबार, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, उपोषणकर्त्या बांधवांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी येथील शिवाजी चौकातून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रॅली काढून शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन व मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी शहरातील शाळा, महाविद्यालय ,बाजारपेठ कडकडीत बंद होते.
येथील शिवाजी चौकात सकाळी ८:३० वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे सई दापके व माजी सैनिक बालाजी पांचाळ यांच्या हस्ते पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. यानंतर भव्य रॅली काढण्यात आली. याप्रसंगी हि रॅली थोडगा रोड ,महेश बँक ,बसवेश्वर चौक ,आंबेडकर चौक ,आझाद चौक ,मारुती मंदिर ,आंबेडकर पुतळा, सावरकर चौकातून ही रॅली नारे देत येथील शिवाजी चौकात आली.यावेळी येथे ठिय्या आंदोलन देण्यात आले. यानंतर मनोगत व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम माने, प्रा. गोविंद शेळके ,प्रा. रोहिदास कदम, ज्ञानोबा भोसले, विनोद माने, सिद्धेश्वर लांडगे, नाना कदम, राजपाल जाधव, अँड. आनंद जाधव, सुप्रिया पवार ,प्रा. दत्ता गलाले, मुकेश पाटील ,धीरज भंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शहरातील शाळा, महाविद्यालय ,व्यापारी प्रतिष्ठान ,आठवडी बाजार ,बस स्थानक ,वाहतूक सर्व काही अगदी कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. ही रॅली अगदी शांततेत व नारे देत वाजत- गाजत काढण्यात आली.सोमवारचा येथे आज आठवडी बाजार असूनही सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.
यावेळी तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले.यात अंतरवली येथील समाज बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घ्यावे, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्या जरांगे पाटील व बांधवांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला ,आरक्षण चळवळीतील शहीद बांधवांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे, सकल मराठा समाजावर अमानुष लाठी चार्ज गोळीबार व अश्रुधुराचा वापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी सकल मराठा समाजात बरोबर आमदार बाबासाहेब पाटील ,माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील ,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ,गणेशराव हाके पाटील,डॉक्टर गणेश कदम, सांबप्पा महाजन आदींसह शहरातील व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.