डॉ. पांडुरंग चिलगर यांची रासेयोच्या विभागीय समन्वयकपदी निवड

डॉ. पांडुरंग चिलगर यांची रासेयोच्या विभागीय समन्वयकपदी निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील हिंदी विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ .पांडुरंग चिलगर यांची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.मलिकार्जुन करजगी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागीय समन्वयकपदी तिसऱ्यांदा निवड केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. पांडुरंग चिलगर हे २०१४ पासून महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांनी अहमदपूर तालुक्यातील उगिलेवाडी या गावाला ‘धूरमुक्त’ करण्यात मोठे योगदान दिले असून परिसरातील अनेक गावात शिबिरे घेऊन गावाच्या सार्वजनिक विकासात मोठे योगदान दिलेले आहे. त्यांना यापूर्वी विद्यापीठाने ‘ राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार ‘ देऊन गौरविले असून यापूर्वीही त्यांनी दोन वेळेस विभागीय समन्वयक म्हणून कार्य केलेले आहे. यावेळी तिसऱ्यांदा त्यांची विभागीय समन्वयकपदी निवड झाली असून, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, उज्ज्वल ग्रामीण महाविद्यालय घोणसी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय जळकोट, यशवंत महाविद्यालय वाढवणा, संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट व मातृभूमी महाविद्यालय उदगीर या महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्षेत्र त्यांना विद्यापीठाने दिले आहे. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डॉ. चिलगर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सतिश ससाणे, डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, डॉ. प्रशांत बिरादार, प्रा. अतिश आकडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author