सुदृढ आरोग्याची वाटचाल व्यायाम आणि वाचनातून – डॉ.गौतमी बांगे
उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शारदीय नवरात्रोत्सव निमित्त ‘आरोग्यावर बोलु काही’ या विषयावर महाविद्यालयातील वस्तीगृहातील मुलींसाठी त्वचारोग तज्ज्ञ डॉ.गौतमी बांगे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना बांगे यांनी सौंदर्य प्रसाधनांचा वापर व त्वचेची काळजी तसेच सुदृढ आरोग्यासाठी सुर्यनमस्कार, योगासने व प्राणायामाचे महत्त्व स्पष्ट केले. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यासाठी वाचनाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात आरोग्य ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे, तरुण वयातच आरोग्याच्या चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. निरोगी जीवनशैलीची आवश्यता व प्रत्येकाने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ जपण्याच्या प्रयत्न केला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अर्चना मोरे यांनी तर आभार वसतीगृहाच्या अधिक्षक श्रीमती एस.एस. स्वामी यांनी मानले. या व्याख्यानास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.एन.कोडचे, पर्यवेक्षक जे.आर.कांदे व वसतीगृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.